काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे सध्या कलाविश्वात अनेकांनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. सोनम कपूर, राधिका आपटे आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’मधून राधिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर खिलाडी कुमार आणि सोनमच्या भूमिका मात्र या बाबतील अपयशी ठरल्या. फार कमी वेळासाठी सोनम या चित्रपटातून झळकली होती. ज्यानंतर अनेकांनीच सोनमची भूमिका चित्रपटात असण्याची काहीच गरजही नव्हती अशा प्रतिक्रिया देत तिच्या भूमिकेविषयी नाराजीचा सूर आळवला. ही सर्व परिस्थिती पाहता चित्रपट लवकर आटोपता घेण्यासाठीच आपल्या भूमिकेवर कात्री चालवल्याचे सोनम कपूरने स्पष्ट केले आहे.

आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सोनमने ‘हफिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या. खिलाडी कुमारच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘चित्रपटात दाखवल्याच्या पलीकडेही अक्षयने साकारलेल्या भूमिकेशी माझे वेगळे नाते होते. पण, चित्रपट लवकर आटोपता घेण्यासाठी माझ्या भूमिकेवर कात्री लावण्यात आली.’ जोपर्यंत एखादी गोष्ट आपण चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत तोपर्यंत या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याचं कारण नाही. भूमिका लहान आहे की मोठी याने फार फरक पडत नाही हा महत्त्वाचा मुद्दा मांडत तिने सर्व चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम दिला.

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?

चित्रपटातील भूमिका लहान की मोठी याविषयी विचार केला तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे त्याविषयी जास्त विचार करण्याऐवजी त्या चित्रपटाने समाजाप्रती किती योगदान दिले आहे यालाच जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे, असेही तिने स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या कामाप्रती असणारी सोनमची निष्ठाच तिच्या या वक्तव्यांमधून सर्वांसमोर आली हे खरं.