बॉलिवूडची ‘चाँदणी’ श्रीदेवी हरपून आज बरीच वर्ष लोटली आहेत. मात्र आजही त्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा होते. २४ फेब्रुवारी २०१८ ला जगाचा निरोप घेणाऱ्या श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. आपल्या सौंदर्याच्या जोरावर अनेकांना घायाळ करणाऱ्या श्रीदेवी यांच्या करिअरप्रमाणेच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच रंजक आणि चर्चेत येणारं होतं. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवशी पुन्हा एकदा चाहते जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यात एक मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी आणि त्यांच्या लव्हस्टोरीवर भाष्य केलं होतं. त्यामुळे आज ही मुलाखत आणि श्रीदेवी -बोनी कपूर यांची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे.

आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या श्रीदेवी या अनेकांचं क्रश होत्या. मात्र त्या बोनी कपूर यांच्यावर भाळल्या होत्या. ७० च्या दशकात श्रीदेवी यांनी पहिल्यांदा पाहिल्यावरच बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते. तिथूनच पुढे बोनी कपूर यांनी श्रीदेवींनी इंप्रेस करण्यास सुरुवात केली होती, असं त्यांनी सांगितलं.
पहिल्यांदा श्रीदेवीला पाहिल्यानंतर हीच आपल्या चित्रपटात असावी असं बोनी कपूर यांना मनोमन वाटलं होतं. म्हणूनच, ते त्यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला गेले. मात्र त्यांची आणि श्रीदेवी यांची भेट होऊ शकली नाही. परंतु, त्यांच्या डोक्यात सतत श्रीदेवींचेच विचार होते. त्यानंतर १९७९ मध्ये श्रीदेवींनी ‘सोलवां सावना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवींची भेट घेतली. विशेष म्हणजे श्रीदेवींना प्रत्यक्ष समोर पाहिल्यानंतर त्याचक्षणी ते श्रीदेवींच्या प्रेमात पडले आणि आपल्या ‘मिस्टर इंडिया’मध्ये श्रीदेवींनी घ्यावं असं त्यांनी निश्चित केलं.

त्याकाळी श्रीदेवी यांच्या चित्रपटांच्या तारखा आणि अन्य प्रोफेशनल गोष्टी श्रीदेवी यांच्या आई पाहत होत्या. त्यामुळे बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी श्रीदेवींना ऑफर दिली. मात्र या चित्रपटासाठी श्रीदेवींच्या आईने १० लाख रुपये मानधन मागितलं. विशेष म्हणजे १० नव्हे, तर ११ लाख रुपये देईन असं बोनी कपूर म्हणाले. इतकंच नाही तर चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना बोनी कपूर सतत श्रीदेवींची काळजी घ्यायचे. त्यांच्यासाठी खास मेकअप रुम तयार करण्यात आली होती. तसंच श्रीदेवींना डिझायन कपडे आवडायचे म्हणून त्यांच्यासाठी खास तीन डिझायनर सेटवर होते. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच बोनी कपूर हळूहळू श्रीदेवींच्या प्रेमात बुडून गेले होते.

दरम्यान, त्यावेळी बोनी कपूर यांचं लग्न झालं होतं आणि त्यांनी दोन मुलंदेखील होते. परंतु, श्रीदेवीच्या प्रेमात ते बुडून गेले होते. त्यामुळे त्यांनी पत्नी मोना यांच्यासमोर श्रीदेवीवर असलेल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली होती. परंतु, बोनी कपूर यांनी श्रीदेवींना प्रपोज करण्यासाठी अनेक वर्ष घेतले. त्यांनी १९९४ साली श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली आणि १९९६ मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.