चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची मुलं करिअरच्या दृष्टीने या क्षेत्राकडे पाहतात. किंबहुना काहींनी तर आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्राची वाटही धरली आहे. अशाच काही चेहऱ्यांपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर. अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी सध्या बॉलिवूड पदार्पणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर कठीण प्रसंगाला तोंड देणारी जान्हवी पुन्हा एकदा तिच्या करिअरकडे वळली आहे. तिच्याप्रमाणेच लहान बहिण खुशीसुद्धा आता करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचं कळत आहे.

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार श्रीदेवी यांच्या धाकट्या मुलीने म्हणजेच खुशीने तिच्या करिअरविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनय क्षेत्रात आपली ओळख न बनवता खुशीने मॉडेलिंग विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. १७ वर्षीय खुशी सध्या तिच्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करत असून, पुढे ती आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग विश्वालाच आपल्या करिअरसाठीचा पर्याय म्हणून निवडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BffFHTfBNO4/

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातील रितसर शिक्षण घेण्यासाठी ती परदेशात जाणार आहे. मुळात फॅशन आणि मॉडेलिंग विश्व हे खुशासाठी नवीन नाही. त्यामुळे ती या क्षेत्रात चांगलीच रुळेल असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर ज्याप्रमाणे जान्हवीने आपला असा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे, त्याचप्रमाणे खुशीच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याचं लक्षात येत आहे. कलाविश्वातील नावाजलेल्या कुटुंबातील खुशी आता तिच्या या निर्णयाला कशा प्रकारे सार्थ ठरवते हे पाहणंच औत्सुक्याचं ठरणार आहे.