‘मॉम’ या चित्रपटातील ‘ओ सोना तेरे लिये’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. बॉलिवूडची मिस ‘हवा हवाई’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारे आहे. तिच्यासोबतच सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना या कलाकारांच्यासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. सावत्र आई आणि मुलीच्या नात्यावर या चित्रपटातून भाष्य केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता प्रेक्षकांना नव्या धाटणीचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील नुकतच प्रदर्शित झालेलं ‘ओ सोना तेरे लिये’ हे गाणं पाहता अनेकांनाच त्यांच्या जीवनातील ‘मॉम फॅक्टर’ किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज येत आहे.

‘फादर्स डे’च्या वातावरणात ‘मॉम’ चित्रपटाचं हे गाणं प्रदर्शित होणं हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल. पण, हा योगायोग अनेकांनाच भावतोय हेसुद्धा तितकच खरं. इर्शाद कामिल लिखित या गाण्याला ए. आर. रेहमानने संगीतबद्ध केलं आहे. तर, रेहमान आणि साशा तिरुपती यांनी ते गायलं आहे. रेहमानच्या आवाजातील आर्ततेमुळे गाण्याचे भाव अक्षरश: हृदयाचा ठाव घेत आहेत.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

दरम्यान, २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटानंतर श्रीदेवीचा हा दुसरा चित्रपट आहे. बोनी कपूर यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’ श्रीदेवीचा ३०० वा चित्रपट आहे. ‘मॉम’ हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. सुरूवातीला हा चित्रपट सैफ अली खानचा ‘शेफ’ आणि श्रद्धा कपूर हिचा ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या दोन चित्रपटांसोबत १४ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार होता. पण काही कारणास्तव ‘मॉम’च्या निर्मात्यांनी हा चित्रपट एक आठवडा आधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.