करिना कपूर- खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या बॉलिवूडच्या गर्ल गॅंगचा ‘वीरे दी वेडिंग’ Veere Di Wedding हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. ज्याच्या बळावर पहिल्याच आठवड्यात दणक्यात ओपनिंग मिळालेला ‘वीरे दी वेडिंग’ हा २०१८ मधील तिसरा चित्रपट ठरला आहे. धमाल कथानकाला सध्याच्या पिढीला पटेल अशा प्रकारे रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. पण, त्यातही अभिनेत्री स्वरा भास्करला काही नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं आहे.

चित्रपटात हस्तमैथून, सेक्स या साऱ्याशी निगडीत दृश्य असल्यामुळे आणि अत्यंत उथळ भाषेचा वापर असल्यामुळे तिच्यावर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. बोल्ड सीन आणि शिव्यांचा या चित्रपटात बराच वापर केल्यामुळे हा कुटुंबासोबत पाहण्याजोगा चित्रपट नाही, असंही काही प्रेक्षकांचं मत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. ‘ते’ दृश्य करतेवेळी थोडीतरी लाज बाळगायला हवी होती, असं म्हणत स्वरावर एका युजरने आगपाखड केली. हस्तमैथुनाचं दृश्य पाहताना आम्हालाच खिजल्यासारखं वाटू लागलं होतं, असंही काही युजर्सनी म्हटलं.

आपल्या भूमिकेविषयी आणि ‘वीरे…’ मधील एका दृश्याविषयी येणाऱ्या या सर्व प्रतिक्रिया पाहून अखेर खुद्द स्वरानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी तिचं मत मांडलं. ट्विटर युजर्स आणि ट्रोलर्सना कसं उत्तर द्यायचं हे स्वरा अचूकपणे जाणत असल्यामुळे तिने अगदी त्याच शैलीत ट्विट करत म्हटलं, ‘कोणीतरी चित्रपटाच्या तिकीटांची स्पॉन्सरशिप दिलेली किंवा या ट्विट्सना स्पॉन्सर केलेलं दिसतंय.’ आपल्यावर टीका करणाऱ्यांना अगदी साध्या पण तितक्याच बोचऱ्या शब्दांमध्ये सुनावणाऱ्या स्वराने खऱ्या अर्थाने ट्रोलर्सना चोख उत्तर दिलं असंच म्हणावं लागेल. तेव्हा आता तिच्या या उत्तरावर नेटकरी आणखी काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं