कलाविश्वात काही चेहऱ्यांना फार कमी वेळातच प्रसिद्धी, प्रेक्षकांचे प्रेम मिळते. अशा चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतर तापसीने बॉलिवूडकडे मोर्चा वळवला आणि या कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलं. ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा २’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी तापसी कोणत्या वादाच्या भोवऱ्यात अडकली नाही. पण, सध्या मात्र तिचे नाव एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
‘एंटरटेन्मेंट की रात’ या कार्यक्रमात तापसीने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी तिने काही रंजक प्रश्नांची उत्तरं दिली. तिच्या एका उत्तराने मात्र अनेकांच्याच भुवया उंचावल्या. भविष्यात तू कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करु इच्छित नाहीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला त्यावेळी तिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव घेतले. ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या वेळी जॅकलिन आणि तापसीने एकत्र काम केले असूनही आता तिच्यासोबत काम करणार नसल्याचे तापसी का म्हणतेय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात कर करु पाहात होता. आपल्या या उत्तराविषयी स्पष्टीकरण देत तापसीने काही गोष्टी उघड केल्या.
जॅकलिनसोबत आपला कोणताही वाद नसून तिच्या सुदृढ शरीरयष्टीमुळे आपल्याला नेहमीच इर्ष्या वाटते त्यामुळे भविष्यात मला तिच्यासोबत काम करायचे नाही, असे तापसीने मिश्लिकपणे हसत सांगितले. त्यामुळे या दोघींमध्ये कोणताच वाद नाही हेच स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये चित्रीकरणादरम्यान, तापसी आणि जॅकलीनमध्ये वाद झाल्याच्या चर्चा होत्या. पण, त्यानंतर या दोघींनीही आपल्यात कोणतेच मतभेद नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले होते.
VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 1:20 pm