News Flash

चित्रपट समाजात संवाद घडवू शकतो’

थप्पड’सारखा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तसे चित्रपट यायला हवेत, अशी अपेक्षाही ती व्यक्त करते.

चित्रपट समाजात संवाद घडवू शकतो’
तापसी पन्नू

सशक्त नायिका लोकांसमोर आणायच्या तर मुळात अभिनेत्रींनी स्वत: तसे चित्रपट करण्यावर ठाम राहिलं पाहिजे. मात्र बॉलीवूडची व्यावसायिक गणितं साधताना फार थोडय़ा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अभिनेत्री हे धाडस करताना दिसतात. तापसी पन्नू हे या अभिनेत्रींमधलं सध्याचं आघाडीवरचं नाव आहे. एकाच वर्षांत ‘साँड की आँख’, ‘गेम ओव्हर’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’ आणि  आता ‘थप्पड’सारखा चित्रपट देणाऱ्या तापसीने आपली स्वत:ची वेगळी ओळख, वेगळी जागा या इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली आहे. एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट करण्यामागची तिची नेमकी प्रेरणा काय असेल? यावर बोलताना ‘थप्पड’सारखा चित्रपट समाजात लगेच बदल घडवून आणू शकत नाही, मात्र ज्या विषयांवर बोलायला हवं त्यावर निदान समाजात एक संवाद घडवून आणण्याची सुरुवात चित्रपट करू शकतो. हीच त्याची ताकद आहे आणि त्या विचारानेच मी असे चित्रपट करत आले आहे, असे ती म्हणते.

‘थप्पड’ हा चित्रपट आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे, असं तापसी सांगते. या चित्रपटाच्या बाबतीत पटकथा माझ्याकडे आली आणि मी होकार दिला असं झालेलं नाही. ‘मुल्क’ असेल किंवा ‘आर्टिकल १५’सारखी या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याकडे तयार नव्हती. ‘मुल्क’ चित्रपटाचे प्रसिद्धी कार्यक्रम सुरू असताना मी त्यांच्याशी या विषयावर बोलले होते.  मला यावर चित्रपट करायचा आहे, असं त्यांना म्हटलं होतं. त्यांच्याही डोक्यात तो विचार होता, त्यामुळे यावर चित्रपट व्हायला हवा याबद्दल आमचं एकमत झालं होतं. ‘आर्टिकल १५’चं चित्रीकरण संपलं आणि त्यांनी लगोलग माझ्या हातात पटकथा ठेवली. ज्या पद्धतीने या चित्रपटाचा जन्म झाला आहे तो खास आहे, असं ती म्हणते. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत जुळवून घ्यावं लागतं. अगदी प्रत्येक गोष्टीत.. ‘थप्पड’ चित्रपटाच्या प्रोमोमध्येही तुम्हाला दिसेल की नायिकेला सांगितलं जातं तू नवऱ्याशी जुळवून घे. तिला नवऱ्याने थप्पड मारली ते विसरून जा आणि आपापसांत बोलून पुढे व्हा.. इतपतच ते मर्यादित नाही आहे. हा खरं म्हणजे संवाद घडवून आणण्याचाच विषय आहे. तुम्ही जेव्हा असा विषय थेटपणे चित्रपटातून समजा एक पाचशे जणांच्या समूहासमोर मांडत आहात. तेव्हा तो पाहणाऱ्यांना एकतर अवघडलेपण येतं. कारण ते त्यांच्या कुटुंबाबरोबर, मित्रमंडळींबरोबर आलेले असतात. त्यांना त्यांच्यासमोर अशा पद्धतीचा विषय येणं फारसं सहजपणे घेता येत नाही. किंवा दुसरी प्रतिक्रिया होते ती म्हणजे माणूस त्यावर विचार करायला लागतो, तो याबाबतीत आपण कुठे आहोत, याची चाचपणी करतो.

गरज पडली तर चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर आपल्या जोडीदाराशी किंवा घरच्यांशी, संबंधितांशी संवाद साधतो. ही संवाद साधण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि तो घडवून आणण्याची ताकद चित्रपट माध्यमात आहे, असे तापसी सांगते. म्हणूनच ‘थप्पड’सारखा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तसे चित्रपट यायला हवेत, अशी अपेक्षाही ती व्यक्त करते.

या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेत ३१ दिवस राहणं ही एकप्रकारे शिक्षा होती, असं ती म्हणते. अमृताची भूमिका सोपी नव्हती. एकतर कोणी तुम्हाला थप्पड मारली तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल.. ही खरंतर खूप वैयक्तिक गोष्ट आहे. ती भूमिका करत असताना प्रत्येक अन्याय्य क्षणाच्या वेळी मला व्यक्त व्हावंसं वाटत होतं. हे सगळं इथेच थांबवा असं सांगावंसं वाटत होतं. पण अमृता वेगळी आहे. ती चटकन व्यक्त होत नाही, ती कोणाला दोष देत नाही. ती प्रत्येकाचं ऐकून घेते, त्यावर विचार करते. आणि सगळ्याचं आपल्या पद्धतीने विश्लेषण करून जे योग्य वाटतं आहे तोच निर्णय ती घेते. ती कुठेही संतापून व्यक्त होत नाही. त्यामुळे आता तरी मला मोकळा श्वास घेऊ द्या.. अशी अवस्था माझी झाली होती, असे तिने सांगितले.

मुळात, या ज्या समस्या आहेत त्या अशिक्षितपणातून आलेल्या नाहीत. आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने आलेल्या नाहीत. हा फक्त पुरुषप्रधान संस्कृतीचा परिपाक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. यासाठी सगळ्यांनीच आपण कुठल्या पद्धतीने जबाबदार आहोत याचा विचार करायला हवा. ते लक्षात आलं तर त्यावर आपल्या माणसांशी संवाद साधायला हवा, मला वाटतं ‘थप्पड’ पाहणाऱ्या प्रत्येकानेच या चित्रपटातून काहीएक विचार घ्यायला हवा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.

स्त्रियांनी तडजोड करायला हवी हे इतकं सहज बिंबवलेलं आहे समाजात की तिच्याकडून दुसरी अपेक्षाच केली जात नाही. प्रत्येक वेळी, अगदी साध्या साध्या गोष्टीतही तिने तडजोड करणं अपेक्षित असतं. नायिकाप्रधान चित्रपट असला तरी अभिनेत्रीला हिरोपेक्षा कमीच मानधन दिलं जातं. कारण हिरो जेवढा तिकीटबारीवर गल्ला गोळा करून आणतो, तेवढं हिरॉईन नाही हे गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ही तडजोड करावी लागते.  जर मुलांनी तुमची छेड काढायला नको असेल तर तुम्ही तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. कपडे साधे घाला किंवा अशा पद्धतीने वागा की पुरुषाचा त्याच्या मनावरचा ताबा सुटणार नाही. रोजच्या जगण्यातल्या या छोटय़ा गोष्टींतही तुम्ही तडजोड करणंच अपेक्षित असतं आणि तेच समाजात भिनलेलं आहे. तापसी पन्नू

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 4:32 am

Web Title: bollywood actress taapsee pannu speak about movie thappad zws 70
Next Stories
1 ‘अश्लील’ म्हणजे काय रे भाऊ?
2 ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवरून कलगीतुरा
3 ‘मराठी बाणा’ची पंधरा वर्षे