बहुप्रतिक्षित असा ६३ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीचा अंदाज आणि त्यांचे स्टाईल स्टेटमेंट पाहण्याजोगे होते. कोणी या रेड कार्पेटवर फ्लोरल गाऊनमध्ये आले, तर कोणाच्या साडीतील लूकने अनेकांना घायाळ केले. फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेत्यांच्याही लूकमध्ये कमालीची विविधता पाहायला मिळाली. सोशल मीडियावर बी- टाऊनच्या या सेलिब्रिटींनी आपल्या खास लूकचे फोटोही पोस्ट केले. त्या फोटोंचे चाहत्यांनी कौतुकही केले. पण, या साऱ्याला अपवाद ठरली ती म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला.

उर्वशीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी काळ्या रंगाच्या लांब हातांचा गाऊन घातला होता. क्रिस्टल फिनिश असणाऱ्या या गाऊनच्या बाह्यांवर फेदर्स लावण्यात आले होते. ज्यामुळे हा गाऊन आणखीनच उठावदार दिसत होता. उर्वशीने मोठ्या उत्साहात आपल्या या रेड कार्पेट लूकचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. पण, हा लूक शेअर करणे तिला चांगलेच महागात पडले.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी झाली असे अनेकांचे मत असले तरीही अनेकदा सेलिब्रिटींच्या दृष्टीने ही गोष्ट काहीशी निराशाजनक ठरते. याचाच प्रत्यय उर्वशीला आला असावा. कारण, डीप नेकलाईन असणाऱ्या गाऊनमधील फोटो शेअर करणाऱ्या उर्वशीला नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेत तिच्यावर शेलक्या शब्दांत टीका केल्याचे पाहायला मिळाले. सर्व मर्यादा ओलांडत यावेळी अनेकांनीच उर्वशीच्या लूकविषयी नापसंती दर्शवली. अर्थात त्या टीकांवर उर्वशीने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, सोशल मीडिया ट्रोलिंगचा हा असा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून सेलिब्रिटींना या साऱ्याचा सामना करावा लागतोय हे नाकारता येणार नाही.