अश्लील चाळे, विनयभंग या साऱ्याचा सामना समाजातील बऱ्याच महिलांना करावा लागला. हे सर्व प्रकार कधी थांबणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. पण, त्यासाठीचे प्रयत्न मात्र कसोशीने सुरु आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरणात वावरता यावं यासाठी बरेचजण प्रयत्नशील आहेत. पण, तरीही या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्री विद्या बालनलाही अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. ‘मेरी सुलू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने विद्याने अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा या ऑडिओ चॅट’ शोमध्ये याबद्दलचा खुलासा केला.

त्या प्रसंगाविषयी सांगताना विद्या म्हणाली, “मी मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयात शिकत होते. एक दिवस मी मैत्रिणींसोबत जात होते. त्यावेळी आम्ही सर्वजणी ट्रेनने प्रवास करायचो. त्याचवेळी मी पाहिलं की आमच्या महिला डब्ब्यात एक मुलगा चढला. तो अगदी आमच्या समोर येऊन बसला. तेव्हा मी त्याला म्हटलं की, ‘हा महिलांसाठी आरक्षित डब्बा आहे’. तर, ‘ठिक आहे मी पुढच्या स्थानकावर उतरेन’ असं तो म्हणाला. पुढचं स्थानक आलं तेव्हा तो उठून दारापाशी गेला. पण ट्रेनमधून उतरला नाही. त्यानंतर तो पुन्हा खिडकीजवळ येऊन बसला. पॅंटची चेन उघडली आणि त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.”

ते सर्व पाहून विद्याचा राग अनावर झाला. तसं होणं सहाजिकच होतं. याच प्रसंगावेळी पुढे काय घडलं हे सांगत विद्या म्हणाली, “त्यावेळी माझ्या हातात फाईल, कागद असं काहतरी होतं. मी हातातील त्या वस्तूंनीच त्याला मारण्यास सुरुवात केली. शिव्याही घातल्या. तो प्रसंगच तसा होता. नशिब पुढचं स्थानक लगेच आलं, नाहीतर त्याला इतका मारला असता की त्याचा जीवच गेला असता.”

https://www.instagram.com/p/BZyyYSCFF_Q/

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

नेहा धुपियाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींबद्दलच्या बऱ्याच गोष्टी उघड होतात. पण, विद्याने तिच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर करत महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे असंच म्हणावं लागेल. आपल्यासोबत झालेल्या अशा प्रसंगांना सर्वांसमोर मांडणारी विद्या ही काही पहिलीच अभिनेत्री नाही. यापूर्वी अभिनेत्री सोनम कपूरनेही तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाचा प्रसंग एका कार्यक्रमादरम्यान सांगितला होता.