विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांनाच आश्चर्यचकित करत गेली.

येत्या काळात ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं कळत आहे. खुद्द विद्यानेच ‘मिड डे’शी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. सागरिका घोष यांच्या ‘इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित वेब सीरिजमध्ये ती ही भूमिका साकारणार आहे. मुळात या पुस्तकात आधारित गोष्टींमुळे त्यावर आधारित चित्रपट साकारण्याचाच विचार होता. पण, बरीच माहिती उपलब्ध असल्यामुळे त्यावर आधारित वेब सीरिज साकारण्याचं निश्चित करण्यात आलं. येत्या काळात या वेब सीरिजचे किती भाग प्रदर्शित होतील याची काहीच कल्पना नाही. पण, सध्यातरी त्यासाठी एका टीमची बांधणी करण्याचं काम सुरु असल्याचं तिने स्पष्ट केलं.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

विद्या तिच्या वाट्याला आलेली ही भूमिका आता नेमकी कशी वठवते हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, येत्या काळात ती एनटीआरच्या जीवनप्रवासावर भाष्य करणाऱ्या चित्रपटातूनही झळकणार असल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपण या चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. ‘हा माझा पहिलाच तेलुगू चित्रपट असल्यामुळे मी फारच उत्सुक आहे. मी विविध भाषांमध्ये कधीच बोल्ले नाहीये, त्यामुळेच ही उत्सुकता आहे. मी एका मल्याळम चित्रपटात लहानशी भूमिका साकारली होती, पण लक्षात राहिल अशी भूमिका मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती’, असं विद्या म्हणाली. या महत्त्वाकांक्षी चित्रपटामध्ये ती एनटीआरच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.