नुकतीच लग्न बंधनात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून समन्स जारी करण्यात आलंय. ईडीने यामी गौतमला चौकशीसाठी बोलावलं आहे. यामीने FEMA (Foreign Exchange Management Act ) संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामीला या प्रकरणी हा दुसरा समन्स पाठवण्यात आला असून. मुंबईत ईडीच्या झोन-२ मध्ये तिची चौकशी होणार आहे.

या चौकशीसाठी ७ जुलैला हजर राहण्याचे आदेश यामीला देण्यात आले आहेत. यामीच्या बँक खात्यात परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळून आली आहे. यामीच्या बँक खात्यातील काही परदेशी व्यवहारात गोंधळ आढळून आला असल्याने यामीची चौकशी केली जाणार आहे.

यामी गौतम नुकतीच तिच्या लग्न सोहळ्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. ४ जून रोजी यामीने ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यामीने तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती.

विक्की डोनर, बाला, बदलापुर, टोटल सियापा, उरी, काबिल अशा अनेक सिनेमांमधून यामीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तर येत्या काळातही यामी वेगवेळ्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक बच्चनसोबत यामी ‘दसवी पास’ या सिनेमात वकिलाच्या भूमिकेत झळकणार आहे. यसोबतच ती सैफ अली खान आणि अर्जुन कपूरसोबत ‘भूत पोलिस’ या हॉरर कॉमेडी सिनेमात एका हटके अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.