बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी गोव्यात हा भीषण अपघात झाला असून यात झरीन किरकोळ जखमी झाली आहे.

‘गोवा टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील अंजुना भागात हा अपघात झाला. झरीनची कार यु-टर्न घेत होती तेव्हाच एक बाईक तिच्या कारवर आदळली. बाईकस्वाराचं नाव नीतेश असं समजत आहे. २० वर्षीय नीतेशने हेल्मेट न घातल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी झरीनच्या कारचालकाला अटक केली असून जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

सलमान खानने झरीनला बॉलिवूडमध्ये लाँच केलं असून त्याच्या ‘वीर’ या चित्रपटातून तिचे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय ‘रेडी’, ‘हाऊसफुल २’ आणि ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे.