‘कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही’, असं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा तिचा संताप व्यक्त केला आहे. अलिकडेच झालेल्या मुलाखतीमध्ये तनुश्रीने १० वर्षांपूर्वी तिच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या प्रसंगाविषयी सांगितलं. अमेरिकेहून भारतात परतलेल्या तनुश्रीने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी तिने MeToo मोहीम, स्त्रीवाद याविषयी चर्चा केली.

२०१८ मध्ये तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर MeToo मोहिमेअंतर्गंत असभ्य वर्तनाचे आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर पुन्हा एकदा तनुश्रीने याविषयी तिचं मत मांडलं आहे.

“नाना पाटेकर यांच्यावर मी Me Too मोहिमेअंतर्गत आवाज उठवल्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी मला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माझं समर्थन केलं. मात्र ट्विट करुन परिस्थिती बदलत नाही. ज्यावेळी या अभिनेत्रींच्या ओळखीच्या दिग्दर्शकांचं नाव MeToo मोहिमेमध्ये आलं त्याचवेळी या अभिनेत्रींनी माझ्याकडे पाठ फिरवली”, असं तनुश्री म्हणाली.

वाचा : ‘कांटा लगा’ फेम शेफाली जरीवाल होणार आई?

पुढे म्हणाली, “मी नाना पाटेकर यांना कधीही सोडणार नाही. त्यांच्यामुळे माझं पूर्ण करिअर उद्धवस्त झालं. मोठ्या मेहनतीने मी माझं करिअर घडवलं होतं. कधीही कामासाठी कोणाचे तळवे चाटले नव्हते की कधीही कामासाठी कोणाची हाजी-हाजी केली नव्हती. तसंच कोणाची रात्र सजवून मी माझं करिअर घडवलं नव्हतं. जे काही करिअर होतं ते माझ्या हिमतीवर होतं. मात्र नाना पाटेकर यांच्यामुळे माझं करिअर उद्वधस्त झालं. त्यांच्या सारख्या लोकांनी माझं मानसिक खच्चीकरण केलं”.

दरम्यान, २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीने केला होता. त्यानंतर कालाविश्वात MeToo मोहिमेचं वादळ सुरु झालं होतं.