करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजलाय. करोना संक्रमण आणि मृत्यूच्या संख्येत सध्या दिलासादायक घट दिसून येतेय. सरकार सोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील करोनाबाधितांची मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इतकंच नव्हे तर शीख समाजाने सुद्धा करोनाबाधितांसाठी गुरूद्वारा खुले करून तिथे करोना सेंटर्स उभारण्यासाठी मदत केली आहे.

शीख समाजाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांच्यावर अनेक स्तरातून कौतुकाची थाप पडत आहे. शीख समाजाने घेतलेला पुढाकार पाहता ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘जेड प्लस’, ‘गुड न्यूज’ आणि ‘परीक्षा’ या चित्रपटातून झळकलेले अभिनेता आदिल हुसैन यांनी सुद्धा आता मुस्लिम बांधवांना आवाहन केलंय.

अभिनेता आदिल हुसैन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेलं ट्विट सध्या वेगाने व्हायरल होतंय. सोबतच त्यांच्या ट्विटवर कमेंट करत नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. शीख बांधवांप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी सुद्धा पुढे येऊन करोनाबाधितांसाठी मस्जिद खुले करून देण्याचं आवाहन अभिनेता आदिल हुसैन यांनी या ट्विटमधून केलंय. पुढे बोलताना अभिनेता आदिल हुसैन म्हणाले, “करोनाबाधितांसाठी मस्जिद खुले करून त्या ठिकाणी सर्वच समाजासाठी उपचार सुरू केले पाहीजेत.” करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये लोकांना निस्वार्थ मदत करण्यासाठी पुढे आलेल्या शीख समाजाचे आदिल हुसैन यांनी कौतूक करत त्यांचे आभार देखील मानले आहेत.

अभिनेता आदिल हुसैन हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. चित्रपटातील अनोख्या धाटणीच्या अभिनयासाठी ते ओळखले जातात. अलीकडेच ते ‘परिक्षा’ या चित्रपटातून समोर आले होते.