‘मोगॅम्बो खुश हुवा..’ हा संवाद कित्येक घरांमधून अबालवृद्धांना तोंडपाठ आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून अक्षरश: राज्य करणाऱ्या अमरीश पुरी यांच्या तोंडी असलेला ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील संवाद वर्षांनुवर्ष लोकांच्या मनात गारुड करून आहे. आज या अभिनेत्याची जयंती आहे. अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाबमधील जलंधर येथे झाला होता. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या अमरीश यांच्या वडिलांचे नाव लाला निहाल चंद पुरी आणि आईचे नाव वेद कौर असे आहे.

हिंदी चित्रपटांमधून खलनायक म्हणूनही आपला ठसा उमटवणारे अमरीश पुरी, त्यांचे दोन्ही मोठे बंधू मदन पुरी आणि चमन पुरी यांच्या भारतीय चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका या स्मरणीय आहेत. आपल्या भावांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाकडे वळलेले अमरीश पुरी त्यांच्या पहिल्या स्क्रिन टेस्टमध्ये अयशस्वी झाले होते. त्यानंतर त्यांनी ईएसआईसीमध्ये नोकरी करण्यासोबतच थिएटरमध्येही काम करण्यास सुरुवात केली होती.

‘प्रेम पुजारी’ या १९७० साली आलेल्या चित्रपटाने अमरीश यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत ४०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. १९८०मध्ये आलेल्या ‘हम पाँच’मध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९८० ते १९९० मधील जवळपास प्रत्येक चित्रपटातील खलनायकाच्या भूमिका त्यांनाच मिळाल्या. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी काही सकारात्मक भूमिकाही साकारल्या. त्यापैकी शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरली. ‘कोयला’, ‘बादशाह’, ‘करण अर्जुन’ आणि ‘गदर: एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००९मध्ये या हरहुन्नरी अभिनेत्याने शेवटचा चित्रपट केला. १३ जानेवारी २००५ रोजी अमरीश पुरी यांनी जगाचा निरोप घेतला.