दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी बॉलीवूडचा रुपेरी पडदा सज्ज झाला असून पुढील दोन महिन्यांत चार मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे सर्व चित्रपट ‘बिग बजेट’असून यामुळे बॉलीवूडमध्ये ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे होणार आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या सुमारास मोठय़ा बॅनरचे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतात. विशेषत: बॉलीवूड ‘खान’दानातील शाहरुख खान त्याचा नवा चित्रपट दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित करतो. सूरज बडजात्या याचा चर्चेत असलेला ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि रणबीर कपूर व दीपिका या जोडीचा ‘तमाशा’ हा चित्रपटही २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. १८ डिसेंबर रोजी रोहित शेट्टी दिग्दर्शित व शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला ‘दिलवाले’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. तर संजय लीला भन्साळी याचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट याच सुमारास प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. आता या तीन मोठय़ा बॅनरच्या चित्रपटांबरोबरच ‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित होईल की तो पुढे ढकलला जाईल याबाबत बॉलीवूडमध्येही उत्सुकता आहे. याशिवाय जेम्स बॉण्ड मालिकेतील ‘स्पेक्टर’ हा चित्रपटही २० नोव्हेंबर रोजी तसेच अन्य काही चित्रपट याच सुमारास प्रदर्शित होणार आहेत. मोठय़ा बॅनरचे आणि दिग्गज कलाकार असलेले चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले तर त्याचा फायदा कोणत्याच चित्रपटाला मिळत नाही. प्रेक्षक विभागले जातात आणि आर्थिक फटका सगळ्याच बसतो. शाहरुख, सलमान यांचे चित्रपट साधारणपणे एका आठवडय़ाच्या अंतराने प्रकाशित होणार आहेत. रणबीर कपूर व दीपिका यांचा ‘तमाशा’ ही याच रांगेत आहे. त्यात संजय लीला भन्साळी याच्या ‘बाजीराव मस्तानी’ची भर पडली तर चार मोठय़ा चित्रपटांची आपापसात टक्कर होणार आहे. यात कोण बाजी मारतो याची प्रेक्षक आणि बॉलीवूड दोघांनाही उत्सुकता आहे.