कायम कोणत्यातरी वादाने चर्चेत राहणारा लोकप्रिय शो बिग बॉस पुन्हा वादात येण्याची चिन्हे आहेत. सध्या हिंदी बिग बॉसचे १३वे पर्व सुरु आहे. मात्र, शो सुरू होऊन आठवडा होत नाही तोच शो बॉयकॉट करण्याचे आवाहन केले जात आहे. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सीनवर आक्षेप घेत हे आवाहन केले जात आहे. शोमध्ये हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात येत असून, लव जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे.

यंदाच्या बिग बॉस पर्व १३ च्या फॉरमॅटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पण हे बदल चाहत्यांच्या पसंतीला उतरले नसल्याचे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस १३ मध्ये भारतीय संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचा आरोप करत भडकलेल्या चाहत्यांनी शो बंद करण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी सलमान खानला ब्लॉक करुन त्याचे स्क्रिन शॉट शेअर केले आहेत. तर दुसरीकडे एका काश्मीरी स्पर्धकाला हिंदू मुलीसोबत बेड शेअर करावा लागत असल्याने शोमध्ये लव जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचे म्हटले आहे. सामान्य माणसांप्रमाणेच राजकीय नेत्यांनीही बिग बॉस हा शो बॉयकॉट करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर #Boycott_BigBoss, #जिहादी_बिगबॉस असे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत.

नेमके काय बदल करण्यात आले?

बिग बॉस १३च्या फॉरमॅटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शोमध्ये सहभागी झालेल्या महिला स्पर्धक आणि पुरुष स्पर्धक बेड शेअर करतात. शो लॉन्चच्या वेळी सलमानने महिला स्पर्धकांना घरात एण्ट्री करण्याआधी एका पुरुष स्पर्धकाला ‘BFF’ (बेड फ्रेंड फॉरेवर) म्हणून निवडण्याचा पर्याय दिला होता. या निवडलेल्या पुरुष स्पर्धकासोबत महिला स्पर्धकाला बेड शेअर करावा लागणार होता आणि इथूनच वादाला तोंड फुटले आहे.