पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही या घटनेचा निषेध करत आपला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे.

शाहरुख खान – अभिनेता शाहरुख खान याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासोबतच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं म्हटलं आहे.

आमिर खान- मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यानेदेखील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला मन विषण्ण करणारा आहे.


लता मंगेशकर – पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करते. या भ्याड हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीला धक्का बसला आहे. या दु:खाच्या प्रसंगात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय एकटे नसून आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत, असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.


राजकुमार राव –
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या प्रकरणी प्रत्येक आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

जान्हवी कपूर –
पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले याचं दु:ख तर मला आहेच. पण त्याही पेक्षा त्यांनी लढण्याची संधी मिळाली नाही या गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटतं. जर आपल्या जवानांना लढण्याची एक संधी मिळाली असती. तर आजही वेळ आली नसती. पुलवामा येथे केलेला हा भ्याड हल्ला होता आणि याचा निषेध आहे. भारतीय जवानांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

दरम्यान, ‘आपल्या जवानांवर करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहीरपणे निषेध आहे. आता या हल्ल्याचं जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांनी केवळ त्यांचीच मुलं गमावली नाहीयेत.तर संपूर्ण देशाने आपल्या भावंडांना गमावलं आहे. त्यामुळे या हल्ल्याचं प्रत्युत्तर आपण द्यायलाच हवं. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे’, असं अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली. या कलाकारांव्यतिरिक्त गोल्डी बहल, कुणाल कपूर, ऋतिक रोशन या कलाकारांनीही सोशल मीडियावर जाहीर निषेध नोंदविला आहे. विशेष म्हणजे  अभिनेता अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा निषेध करत शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.