चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या कुटुंबातील बरेचजण याच क्षेत्रात करिअरच्या वाटा निवडतात. त्यापैकीच काही कलाकार म्हणजे अभिनेता वरुण धवन, निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता सैफ अली खान. या क्षेत्राशी आपल्या कुटुंबाचा असणारा संबंध आणि एकंदर आपलं या क्षेत्राशी जोडलं जाणं याविषयी बोलण्यापासूनही ही मंडळी कधीच मागे हटली नाहीत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून घराणेशाहीच्या मुद्द्याविषयी होणाऱ्या चर्चा पाहता आयफा पुरस्कार सोहळ्यातही त्याचीच चर्चा पाहायला मिळाली. करण जोहर आणि सैफ अली खान यांनी आयफाच्या सूत्रसंचालनादरम्यान पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्याला चालना दिली.

न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन चर्चा होत असतानाच वरुण धवननेही त्यांना साथ दिली. ‘ढिशूम’ या चित्रपटासाठी विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या वरुण धवनची खिल्ली उडवत सैफ म्हणाला, ‘तुझ्या वाट्याला आलेलं यश हे फक्त तुझ्या वडिलांमुळे म्हणजेच डेव्हिड धवन यांच्यामुळेच आहे.’ त्यावर उत्तर देत वरुण म्हणाला, ‘तूसुद्धा जे काही आहेस ते फक्त तुझ्या आईमुळेच.’ या दोघांमध्ये करणनेही त्याचं मत मांडत, ‘मीसुद्धा इथे माझ्या वडिलांमुळेच आहे’, असल्याचे म्हटले. या तिन्ही कलाकारांनी त्यानंतर ‘नेपोटिझम रॉक्स’, अशा घोषणाही केल्या. त्यानंतर वरुणने लगेचच करणला उद्देशून तुझ्या चित्रपटात ‘बोले चु़डिया बोले कंगना..’ हे गाणं आहे असं म्हणत विषयाला वेगळं वळण दिलं. या गाण्यात ‘कंगना’च्या नावचा उल्लेख असल्यामुळेच त्याने ही कोपरखळी मारली. करण, कंगना आणि घराणेशाही या तीन मुद्द्यांना अनुसरुनच वरुणने असं केलं असावं.

PHOTO : ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

वरुणने हे गाणं म्हणताच, ‘कंगना ना बोले तो ही अच्छा है… कंगना बहुत बोलती है’, असं म्हणत करणने त्या वेळी योग्य प्रतिक्रिया दिली. करण, वरुण आणि सैफने मुद्द्यावरुन आयफा सोहळ्यामध्ये केलेली ही घोषणाबाजी विनोदी अंदाजात असली तरीही घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हं आहेत असंच म्हणावं लागेल.