२०२० हे वर्ष कलाविश्वासाठी जणू अनलकी ठरलं आहे. या वर्षामध्ये कलाविश्वाने अनेक दिग्गजांना गमावलं. इरफान खान, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर संगीतकार वाजिद खान यांच्या निधनामुळे कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानकपणे वाजिद खान यांचं निधन झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला असून सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन वाजिद खान यांना आदरांजली अर्पण केली आहे. वाजिद खान यांच्या निधनामुळे खरंच धक्का बसला आहे. एक हसमुख व्यक्तीमत्त्व आज आपल्याला सोडून गेलं, असं ते म्हणाले आहेत.

”मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे. वाजिद भाई यांच्या चेहऱ्यावरील हसू कायम माझ्या लक्षात राहिलं. ते फार हसमुख स्वभावाचे होते. फार लवकर तुम्ही सोडून गेलात. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं ट्विट अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलं.

“वाजिद खान हे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती होते. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते. तुम्ही कायम आमच्या स्मरणात रहाल. कलाविश्वाला उत्तम संगीत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद”, असं ट्विट वरुण धवनने केलं.

“वाजिद भाई फार सुंदर व्यक्ती होते. कायम हसतमुख आणि सतत गाणी गुणगुणत असतं. त्यांच्यासोबतचं प्रत्येक संगीत कायम लक्षात राहिलं.खरंच तुमची फार आठवण येईल”, असं परिणीती चोप्रा म्हणाली.

“आमच्या सगळयांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. सुपरिहट गाणी देणारा, उत्तम गायक, संगीतकार माझा मोठा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून गेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही कायम आमच्या आठवणींमध्ये असाल. कलाविश्वाची ही सगळ्यात मोठी हानी आहे”, असं मिका सिंग म्हणाला.

दरम्यान, सोनू निगम, अमिताभ बच्चन, रणवीर शौरी, विशाल ददलानी, बाबूल सुप्रियो,अरबाज खान,अरमान मलिक,सोना मोहपात्रा अशा अनेक दिग्गजांनी वाजिद यांनी आदरांजली अर्पण केली आहे.