सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करीत आहेत. अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवूड इंस्ट्रीला खूप मोठा लॉस झाला आहे. त्यांनी आजवर २००० पेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली आहेत. मी अलादीन या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी या चित्रपटातील गाणे कोरिओग्राफ केले होते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली आहे या आशयाचे ट्विट रितेशने केले आहे.

त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरोज खान या हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणे असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले होते. इतकच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले.

१९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.