|| स्वप्निल घंगाळे

सध्या सगळीकडे निवडणुका आणि आयपीएल या दोनच गोष्टींची चर्चा आहे. आयपीएलच्या रंजक सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींपैकी एक जाहिरात सर्वाचे लक्ष वेधून घेताना दिसतेय. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी या जाहिरातीत दिसतो, पण विशेष म्हणजे याआधी कधीही ऑनस्क्रीन न दिसलेली त्याची पत्नीही या जाहिरातीमध्ये दिसतेय. अशा प्रकारे सेलेब्रिटी जोडप्यांनी एकत्र जाहिरात करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; पण तरीही जेव्हा साक्षी आपल्या नवऱ्याबरोबर जाहिरातीत झळकली तेव्हा सगळ्यांचेच लक्ष जाहिरातीकडे वेधले गेले. धोनी आणि साक्षीच्या नात्यातील ताकद आणि ज्या टूथपेस्टची जाहिरात केली जाते आहे ती कशा प्रकारे ताकदवान आहे, असा संदर्भ या जाहिरातीत लावण्यात आला आहे. सेलेब्रिटी जोडप्यांना घेऊन जाहिरात करण्याचा ट्रेण्ड जुना असला तरी सध्या त्यातही अधिकाधिक प्रयोग होताना दिसतायेत..

सेलेब्रिटी आणि जाहिरात म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यांसमोर येणाऱ्या दोन जोडय़ा म्हणजे विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान-गौरी खान. लग्नानंतरच्या एका वर्षांत काय काय बदल होतो हे विराट आणि अनुष्का एका कपडय़ांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीत सांगताना दिसतात. अर्थात विराट आणि अनुष्का यांची भेटच जाहिरातीच्या निमित्ताने झाली आणि मग तिथून सुरू झालेली या एका जोडप्याची गोष्ट अगदी लग्नापर्यंत पोहोचली. एका शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये या दोघांनी काम केले होते. त्यानंतर एक बडय़ा कपडय़ांच्या कंपनीच्या जाहिरातीत हे दोघे दिसले. लग्न सोहळ्यातील या जाहिरातीमधील दोघांचेही लुक्स अनेकांना भावले. त्यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नातील फोटोही याच कंपनीच्या ब्रॅण्डची जाहिरात आहे का, असा मजेदार प्रश्नही अनेकांनी ट्विटरवर विचारला होता. मुळात असा प्रश्न पडणे हेच या जोडीने केलेल्या जाहिरातीचे यश आहे. लग्न समारंभातील कपडे म्हणजे विराट आणि अनुष्कावाली जाहिरात ही संकल्पना डोक्यात बसल्यानेच अनेकांनी या दोघांच्या लग्नाचे शूट आहे की जाहिरातीचे, असा प्रश्न विचारला.

दुसरी महत्त्वाची जोडी म्हणजे शाहरुख-गौरी. गेल्या काही दशकांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक जोडय़ा जमल्या आणि तुटल्या. पण शाहरुख-गौरीसंदर्भात वादाची क्वचितच एखादी बातमी आली आहे. म्हणजेच विश्वासार्हता या मुद्दय़ावरून एका होम डेकोर म्हणजेच घरातील फर्निचर वगैरे विकणाऱ्या कंपनीने या दोघांना एकाच जाहिरातीत कास्ट केले. कायमच चर्चेत असणारं आणखी एक सेलेब्रिटी जोडपं म्हणजे करिना आणि सैफ अली खान. एका प्रसिद्ध बॅग कंपनीने या दोघांना करारबद्ध केले आहे. त्याशिवाय ‘सैफीना’ एका बुटांच्या कंपनीच्या जाहिरातीमध्येही एकत्र झळकले आहेत. अजय देवगण आणि काजोल ही जोडीही प्रेक्षकांनी वॉशिंग मशीन, साबणाच्या जाहिरातींमधून ऑनस्क्रीन पाहिली आहे. एका ब्रॅण्डेड तांदळाच्या जाहिरातीमध्ये अभिनेता अक्षयकुमार आपली पत्नी ट्विंकल खन्ना हिला बिर्याणी खाऊ  घालताना दिसतो. तर हेच दोघे एका ज्वेलर्सच्या जाहिरातीमध्येही दिसले आहेत. याशिवाय आता टीव्ही, फ्रीजसारख्या होम डय़ुरेबल्स विकणाऱ्या एका कंपनीने दीपिका पडुकोण आणि रणवीर सिंग यांना करारबद्ध केले असून नुकतीच या दोघांची पहिली जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मजेशीर गोष्ट अशी की या जाहिरातीआधी दीपिका आणि रणवीर अनेकदा विरुद्ध कंपन्यांची जाहिरात करताना दिसले. या दोघांच्या जवळजवळ पाचहून अधिक जाहिराती या एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या होत्या. यामध्ये भटकंतीचे अ‍ॅप्स, मोबाइल कंपन्या, बँका, शम्पू आणि रंगांच्या कंपन्यांचा समावेश आहे. कायमच विरुद्ध ब्रॅण्डची जाहिरात करणारे हे दोघे अखेर लग्नानंतर पहिल्यांदाच एकाच ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये दिसणार आहेत.

एका वॉटर फ्युरिफायरच्या जाहिरातीमध्ये धक् धक् गर्ल माधुरीबरोबर तिचे पती डॉ. नेनेही झळकले आहेत. नेने दाम्पत्याबरोबरच बच्चन कुटुंबातील दोन्ही सेलेब्रिटी जोडपी म्हणजे अमिताभ-जया आणि अभिषेक-ऐश्वर्या अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले आहेत. खासकरून ज्वेलर्सच्या जाहिरातींमध्ये अमिताभ-जया यांची जोडी दिसून आली. तर अभिषेक-ऐश्वर्या एका साबणाच्या जाहिरातीमध्ये तसेच स्वयंपाकघरातील भांडी बनवणाऱ्या बडय़ा ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसले आहेत. जाहिरातींसाठी सेलेब्रिटी जोडपं निवडताना त्याचं नातं, जनमानसात असणारी त्यांची प्रतिमा या सगळ्याचा विचार केला जातो. सेलेब्रिटी जोडपं जाहिरातीत असल्यास त्या जाहिरातीचा गाभा अनेकदा कौटुंबिक पद्धतीचा असतो. म्हणजेच सुरक्षा, काळजी, भविष्यातील विचार, मुलांची चिंता यासारख्या विषयांचा आधार घेऊन बनवल्या जाणाऱ्या या जाहिरांतीमध्ये सेलेब्रिटी जोडय़ा घेतल्यास जो कमवता वर्गातील ग्राहक आहे म्हणजेच जाहिरातींच्या भाषेत वस्तू विकत घेण्याचा निर्णय घेणारा ग्राहक आहे तो अधिक प्रभावित होतो. जाहिरातदारांना अनेकदा सेलेब्रिटी जोडपी आर्थिक खर्चाच्या दृष्टीने परवडतात. कारण अनेकदा अशा जाहिरातींसाठी दोघांना एकच पॅकेज ऑफर केले जाते, त्यामुळे तडजोड करणे शक्य होते, असं जाहिरात श्रेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

तसा सेलेब्रिटी जोडप्यांनी जाहिराती करण्याचा ट्रेण्ड अगदी मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर आणि मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी या जोडय़ांपासून दिसतो. या दोन्ही जोडय़ांनी शूटिंग आणि शìटगच्या जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय रिलेशनशिपमध्ये असताना जाहिरातींमध्ये झळकलेल्या जोडप्यांची नावं घ्यायची झाल्यास जॉन अब्राहम-बिपाशा बासू (श्ॉम्पूची जाहिरात), ऐश्वर्या राय-विवेक ओबेरॉय (शीतपेयाची जाहिरात) यांची नावे घेता येतील. ‘नच बलिये’मधील स्पर्धक असणारे आणि टीव्हीवरील एके काळचे प्रसिद्ध जोडपे म्हणजे अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी, या दोघांनीही एका तुपाच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे.

खेळ आकडय़ांचा

‘ईपीएस प्रॉपर्टीज’ या कंपनीच्या एका आकडेवारीनुसार सेलेब्रिटी असणाऱ्या ब्रॅण्डची संख्या २००७ मध्ये ६५० इतकी होती तर २०१७ मध्ये ती १ हजार ६६० इतकी झाली आहे. भारतातील एकूण जाहिरातींपैकी २३ टक्के जाहिरातींमध्ये सेलेब्रिटी दिसतात, असं ‘केंटर मीलवॉर्ड ब्राऊन’ कंपनीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. जाहिरातींमध्ये सेलेब्रिटी असल्याने त्याचा ग्राहकांवर अधिक प्रभाव पडतो. हाच प्रभाव अधिक परिणामकारक करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आता अनेक कंपन्या थेट सेलेब्रिटी जोडप्यांनाच करारबद्ध करताना दिसत आहेत. म्हणजे एकाच जाहिरातीमध्ये जर अनुष्का आणि विराट असेल तर त्या जाहिरातीचा प्रेक्षकवर्ग तीनपट वाढतो. म्हणजेच अनुष्काचे चाहते, विराटचे चाहते आणि नवीन लग्न झालेली जोडपी अशा तीन गटांतील ग्राहकांना या एकाच जाहिरातीमधून आकर्षित करता येते.

मराठीत काय स्थिती?

एका बँकेच्या जाहिरातीमध्ये मराठीमधील सर्वात लोकप्रिय सेलेब्रिटी जोडपे असणारे प्रिया बापट आणि उमेश कामत पाहायला मिळाले. त्याचबरोबर ‘नच बलिये’चे पहिले पर्व जिंकणारे अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे एका खाद्यतेलाच्या जाहिरातीमध्ये एकत्र झळकले आहेत. इतकेच काय तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबई रिव्हर अँथमच्या माध्यमातून समाजिक संदेश देताना एका व्हिडीओत दिसले. मराठीमध्ये मुळात सेलेब्रिटी जोडपी तुलनेने कमी आहेत. त्यातही टीव्हीवरील जाहिरातीऐवजी अनेकदा बडय़ा बिल्डर्सच्या जाहिरातींमध्ये मराठी सेलेब्रिटी जोडपी पोस्टर्सच्या माध्यमातून दिसतात.