सलमानच्या बहुप्रतिक्षीत ट्युबलाइट सिनेमाचा दमदार टीझर अखेरीस प्रदर्शित झाला. ट्यूबलाइटचा टीझर पाहिल्यावर सलमानच्या या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असणार यात काही शंका नाही.

टीझरची सुरूवातच आकाशवाणीवरील युद्धाच्या बातमीने होते. निसर्गरम्य दृश्य ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. अगदी ‘बजरंगी भाईजान’मध्ये ज्यापद्धतीने काश्मिरचे सौंदर्य दाखवण्यात आले होते. त्याच धाटणीचं सौंदर्य या सिनेमातही दिग्दर्शक कबीर खानने दाखवले आहे.

टीझरमध्ये महात्मा गांधींचा काळ, युद्धजन्य परिस्थिती, लडाखमधील शाळा हे सर्व बघण्यात मन रमत असतानाच सलमानची दमदार एण्ट्री दाखवण्यात आली आहे. सलमानच्या एण्ट्रीला टाळ्या मिळाल्याशिवाय राहात नाहीत. हा टीझर बघताना ‘बजरंगी भाईजान’मधला साधा भोळा सलमान डोळ्यासमोर येतो.

संपूर्ण टीझरमध्ये ‘यकीन एक ट्युबलाइट की तरह होता है.. देर से जलता है.. पर जब जलता है तो फुल्ल लाइट कर देता है’… हा आशयघन संवाद लक्ष वेधतो. सोहेल खानने या सिनेमात एका सैनिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचीही झलक या टीझरमध्ये दिसते. तसेच माटिन रे तंगू या बालकलाकारासोबतची सलमानची जोडी फार सुरेख दिसते. भाईजानने माटिनचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही शेअर केला होता. येत्या ‘ईद’ला सलमानची ही ‘ट्युबलाइट’ तिकीटबारीवर किती ‘प्रकाश’ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

या टीझरच्याआधी ‘ट्युबलाइट’चे अनेक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामुळे नक्की टीझर असणार तरी कसा याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत होती. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. यात बऱ्याच लहान मुलांचा आवाज ऐकू येत होता. ती सर्व लहान मुलं ‘जल जा, जल जा’ असं म्हणत असताना या प्रोमोमध्ये ऐकू येत होतं.

कबीर खान दिग्दर्शित या सिनेमातमध्ये सलमानसोबतच चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. तिच्याशिवाय अभिनेता सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरीसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे कबीर खानने सर्वार्थाने हा सिनेमा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लडाख आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

‘ट्युबलाइट’ व्यतिरिक्त सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या बांधणीमध्ये व्यग्र आहे. ‘टायगर जिंदा है’मधून तो अभिनेत्री कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. एकेकाळी ‘दबंग’ खानची प्रेयसी म्हणून चर्चेत असलेली कतरिना पुन्हा सलमानसोबत स्क्रिन शेअर करत असल्यामुळे या दोघांचीही ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे.