19 February 2019

News Flash

Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

धडक या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला. अशात आठवण येते आहे ती श्रीदेवीची कारण जान्हवीला सिनेमात पाहणे हे तिचे स्वप्न होते जे अधुरेच राहिले

Dhadak Movie Trailer Launch संग्रहित छायाचित्र

एखादा कलाकारही सामान्य माणसाप्रमाणे अनेक स्वप्ने उराशी बाळगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. अनेक स्वप्ने पूर्ण होतातही.. मात्र एखादे स्वप्न असे असते की ते अपुरे राहते त्या कलाकाराच्या अकाली एक्झिटमुळे. तसे झाले की आपल्यालाही हळहळ वाटतेच. धडक या सिनेमाचा ट्रेलर आजच समोर आला आहे. अशात श्रीदेवीचे अपुरे राहिलेले स्वप्न आज आपल्याही डोळ्यासमोर येते आहे. श्रीदेवी एक अभिनेत्री म्हणून प्रख्यात होती.. तिचे सिनेमातले कमबॅकही जोरदार झाले होते. मात्र तिची एक्झिट चटका लावून गेली आणि त्यासोबत हळहळ वाटणारे ठरले ते तिने उराशी बाळगलेले स्वप्न. तिचे स्वप्न होते की मुलगी जान्हवी कपूरचा सिनेमा धडक पाहायचा. या सिनेमाची तिला एवढी उत्सुकता होती की श्रीदेवीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर १६ नोव्हेंबरलाच धडक या सिनेमाचे पोस्टर Pinned Tweet म्हणून ठेवले होते. मात्र तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

एक अभिनेत्री म्हणून श्रीदेवीची कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली. बालकलाकार, ते अवखळ अभिनेत्री ते प्रगल्भ अभिनेत्री असे अनेक टप्पे श्रीदेवीने यशस्वीपणे पार पाडले. जुदाई या सिनेमानंतर तिने बोनी कपूरशी लग्न करत चित्रपट सृष्टी सोडली. त्यानंतर इंग्लिश विंग्लिश सिनेमातून कमबॅक केले. हा सिनेमाही चांगलाच गाजला. त्यानंतर आलेल्या मॉम सिनेमानेही लोकांची वाहवा मिळवली. अशात वयाच्या या टप्प्यावर श्रीदेवीचे लक्ष होते ते आपल्या मुलींकडे.. गवयाचे मूल जसे सुरात गाते असे म्हणतात. त्याचप्रमाणे अशा गुणी अभिनेत्रीच्या मुलीनेही सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. आता आपली कारकीर्द अत्यंत अवखळपणे गाजवणाऱ्या श्रीदेवीची जबाबदारी आणखी वाढली. एक आई म्हणून ती या सिनेमाकडे पाहात होती. जान्हवीला अभिनयाचे धडे आई श्रीदेवी आणि वडिल बोनी कपूर यांच्याकडून मिळाले असणारच.

धडक सिनेमासाठी तिने आपल्या मुलीकडून तयारी करून घेतल्याच्याही बातम्या येत राहिल्या. मात्र मुलीला मोठ्या पडद्यावर काम करताना पाहून मिळणारा आनंद आणि समाधान श्रीदेवीला हवे होते. ते मिळाले नाहीच… याचे महत्त्वाचे कारण ठरले तो तिचा अकाली मृत्यू २४ फेब्रुवारी २०१८ ला दुबईला एका लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी गेली होती त्यावेळीच तिचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसोबतच तिचे स्वप्नही अधुरेच राहिले. आपल्या मुलीच्या सिनेमाची तिला किती ओढ लागली होती हे तिचे अधिकृत ट्विटर हँडल पाहिले की आजही लक्षात येते. आज धडकचा ट्रेलर रिलिज झाला आहे तेव्हा चाहता म्हणून मनात जी भावना येते आहे ती माझ्यासह अनेकांच्या मनात अशीच असणार आहे की श्रीदेवी आज तू हवी होतीस!

धडकचा ट्रेलर रिलिज
जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या दोघांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा सैराट या नागराज मंजुळेच्या सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. सैराटमधल्या आर्ची परशाने महाराष्ट्राला वेड लावले. इतक्या या दोघांच्या भूमिका आणि हा सिनेमा गाजला. आता धडक सिनेमा लोकांना कसा वाटतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २० जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाचा ट्रेलर आजच रिलिज झाला. सिनेमावर मराठीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय. झिंगाट गाण्याचे हिंदी व्हर्जनही सिनेमात आहे. त्यामुळे आता जान्हवी आणि इशान हे बॉलिवूडचे आर्ची आणि परशा ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समीर जावळे

First Published on June 11, 2018 1:14 pm

Web Title: bollywood dhadak movie sridevi daughter jhanvi blog in marathi