टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये रिअॅलिटी शोच्या संकल्पना बदलल्याचं पाहायला मिळालं. काही कार्यक्रम नव्या धाटणीने प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले. त्यातच या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या रिअॅलिटी शोने बरीच प्रसिद्धी मिळवली. आपल्या शारीरिक वयानुसार अपेक्षेपेक्षा जास्त वेगळ्या काही अनोखी गोष्ट प्रेक्षकांसमोर आणि सेलिब्रिटी परीक्षकांसमोर परफॉर्म करत बऱ्याच लहान मंडळीनी टेलिव्हिजन विश्वात बरीच प्रसिद्धी मिळवली. पण, झगमगाट आणि मोठ्या दिमाखात पार पडणाऱ्या या रिअॅलिटी शोच्या मागे एक असं सत्य दडलंय जे कित्येकदा समोरही आलं नाहीये. त्याचाच उलगडा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अमोल गुप्ते यांनी केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील मध्यमवर्गीय मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक प्रकारचं आमिष दाखवणाऱ्या रिअॅलिटी शोचं दाहक वास्तव अनेकांपासून लपवण्यात आलं, हेच त्यांच्या बोलण्यातून उघड झालं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला याविषयी माहिती देत गुप्ते म्हणाले, ‘अनेकदा दुर्गम भागांतून त्यांना (स्पर्धकांना) मुंबईत बोलवण्यात येतं. पण, इथे आल्यावर त्यांना स्वस्तातील हॉटेलमध्ये राहण्याची सोय करुन देण्यात येते. नेहमीच त्यांना चित्रीकरणाच्या निमित्ताने स्टुडिओपर्यंतचा प्रवास करावा लागतो. मुख्य म्हणजे रोजच्या आयुष्यातील खेळणं- बागडणं या साऱ्यापासून त्यांना दूर ठेवलं जातं. कार्यक्रमासाठी त्यांना बरेच तास चित्रीकरण करावं लागतं. कधीकधी तर अशक्य परिस्थितीतही त्यांना या शोजचा एक भाग व्हावं लागतं.’

याविषयीचाच एक गंभीर अनुभव सांगत गुप्ते म्हणाले, ‘एक लहान दृष्टीहीन मुलगा त्या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. संपूर्ण दिवसभर त्याने रियाज केला, मुख्य म्हणजे फार बिकट परिस्थितीत त्याने हा रियाज केला आणि रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाची वेळ आली. पण, त्यावेळी त्याचा आवाजच येत नव्हता.’, हा प्रसंग सांगताना त्याचं गांभीर्य इतरांनीही जाणावं अशीच भावना व्यक्त होत होती. सध्याच्या घडीला या विषयीचे काही नियम बदलण्याची गरज आहे अशी मागणीही त्यांनी केली.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक शुजित सरकारने केलेल्या मागणीने या विषयाला तोंड फुटलं होतं. लहान मुलांचे रिअ‍ॅलिटी शो तातडीने बंद करावेत, अशी मागणी शुजितने केली होती. त्यांच्या या मागणीवरून पुन्हा एकदा रिअ‍ॅलिटी शोचा मुद्दा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं.