करोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. तसंच या दिवसामध्ये नागरिकांना घराबाहेर शक्यतो न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. यातच एका नागरिकाला पोलीस मारत असल्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती घरात लागणाऱ्या काही वस्तू  बाईकवर घेऊन जात होता. मात्र या व्यक्तीला पाहून पोलिसांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करत पोलिसांचं हे वर्तन योग्य आहे का? असा प्रश्न अनुभव सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.

‘कोणालाही अशा पद्धतीने मारणं कायदेशीररित्या योग्य आहे? या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय की, हा व्यक्ती घरातलं सामान घेऊन जातोय. तरीदेखील पोलिसांनी त्याला अडवलं आणि मारायला सुरुवात केली, हे योग्य आहे का?’, असा सवाल अनुभव यांनी विचारला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अनुभव सिन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. त्यामुळे बऱ्याचवेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर ते व्यक्त होत असतात. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या देशात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.