देशात वाढत्या मॉबलिंचिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करत निरनिराळ्या क्षेत्रातील 49 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले होते. तसेच अनेकांनी आपल्या सोशल मीडिया हँडवर ते पत्र शेअरही केले होते. यामध्ये बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप याचादेखील समावेश होता. आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी पत्र शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा वाद उद्भवला आहे.

अनुराग कश्यपने हे पत्र शेअर केल्यानंतर एका ट्विटर युझरने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ”नुकतीच मी माझ्या रायफलची आणि शॉटगनची सफाई केली आहे आणि तिला अनुरागला समोरासमोर भेटण्याची इच्छा होत आहे,” अशा आशयाचे ट्विट एका युझरने केले आहे. दरम्यान, अनुराग कश्यपने त्वरित हे ट्विट मुंबई पोलिसांना फॉरवर्ड केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनीही या ट्विटची गंभीर दखल घेतली आहे.

याविरोधात नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, अपर्णा सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुदगल, इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्यासह ४९ जणांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून देशातील मॉबलिंचिंगच्या घटनांवरून चिंता व्यक्त केली. मॉबलिंचिंगच्या घटनांवर तुम्ही संसदेत टीका केली असली, तरी ते पुरेसे नाही. या घटनेच्या सूत्रधारांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न मोदींना पत्रात विचारण्यात आला आहे. सरकारविरुद्ध मतभेद असल्याने लोकांना राष्ट्रविरोधी किंवा शहरी नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकले जाऊ नये, असेही पत्रलेखकांनी म्हटले आहे.