करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनला जनतेने देखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र काही अतिउत्साही लोकांनी रस्त्यांवर उतरुन जल्लोश केला. या प्रकारावर बॉलिवूड दिग्दर्शक केन घोष यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले केन घोष?

केन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर गर्दी करुन थाळ्या वाजवत जल्लोष करणारे लोक दिसत आहेत. “पंतप्रधानांनी अशा प्रकारे करोना योद्ध्यांचे आभार मानायला नक्कीच सांगितले नव्हते.” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या ट्विटवर केली आहे.

केन घोष यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी रिचा चड्ढा, ओनिर, रोनित रॉय यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी लोकांनी केलेल्या अशा प्रकारच्या जल्लोशावर संताप व्यक्त केला आहे.