पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडू शाहिद आफ्रिदीने एक ट्विट करत अनेकांचंच लक्ष वेधलं. काश्मीरमधील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत ही सर्व परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनीच आफ्रिदीला खडे बोल सुनावल्याचंही पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू गौतम गंभीर यानेही शेजारी राष्ट्रातील खेळाडूची काळजी लक्षात घेत त्याचा समाचार घेतला.

गंभीरमागोमागच आता दिग्दर्शक मधुर भांडारकर यानेही ट्विट करत आफ्रिदीला चांगलंच सुनावलं आहे. ‘खोट्या आणि बनावट गोष्टींच्या आहारी जाऊ नकोस. भारतातील शायकीय यंत्रणा आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. इथे फक्त पाकिस्तानला आपली लुडबूड आणि दहशतवादी कारवाया थांबवण्याची गरज आहे’, असं ट्विट त्याने केलं. सोबतच काही आंतरराष्ट्रीय संघटनांनीही दहशतादी कारवायांचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तानची निंदा केली आहे, या मुद्द्याकडेसुद्धा मधुरने आपल्या ट्विटमधून प्रकाशझोत टाकला. हे ट्विट करत असताना त्याने शाहिदच्या ट्विटर हॅंडलचाही यात उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता आफ्रिदी मधुरला काही उत्तर देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

रविवारी लष्कराने दहशतवादी अभियानाअंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी सरकारने याविषयी दु:ख व्यक्त केलं होतं. पाकिस्तानचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी यानेही ट्विट करत या सर्व परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर या विषयाला चालना मिळाल्याचं पाहायला मिळालं. येत्या काळात काश्मीर मुद्द्यावरुन उद्भवणारी परिस्थिती पाहता आफ्रिदी पुन्हा बरळणार का, याकडे अनेकांचच लक्ष लागून राहिलं आहे.