14 December 2017

News Flash

हॉलिवूड सेलिब्रिटीने करण जोहरचा अपमान केला तेव्हा…

करणने बऱ्याच गोष्टींवर खुलेपणाने चर्चा केली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 3:09 PM

करण जोहर

सहसा एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सेलिब्रिटींमध्ये मित्रत्त्वांचं नातं असतं. अगदीच हे नातं नसलं तरीही त्यांची तोंड ओळख तरी असते. पण, बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वच कलाकार एकमेकांना ओळखतात असं नाही. अशाच एका प्रसंगाला निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला सामोरं जावं लागलं होतं. एका हॉलिवूड सेलिब्रिटीच्या वागण्यामुळे करणचा अपमान झाला होता. याचा खुलासा त्याने नेहा धुपियाच्या ऑडिओ चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये केला.

त्या प्रसंगाची आठवण सांगताना करण आपल्या विनोदी शैलीत म्हणाला, “जवळपास दोन वर्षांपूर्वी मला वूडी अॅलेन यांना भेटण्याची संधी मिळाली होती. ते पेपर वाचत होते, त्याचवेळी मी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गेलो. ‘निरंजन अय्यंगर या माझ्या मित्राला ही स्वाक्षरी हवी आहे’, असं मी त्यांना सांगितलं आणि मोठ्या आशेने त्यांच्यापाशी उभा राहिलो. पण, त्यावेळी त्यांनी स्वाक्षरी देण्यास स्पष्टपणे नकार दिला.”

आपल्यासोबत असे प्रसंग बऱ्याचदा घडले आहेत असंही त्याने गप्पांच्या ओघात स्पष्ट केलं. याविषयीचाच आणखी एक अनुभव सांगत करणने एक आठवण जागी केली. नुकत्याच पार पडलेल्या मेलबर्न चित्रपट महोत्सवात त्याने अभिनेता ह्यू जॅकमनला पाहिलं. त्यावेळी त्याने जॅकमनची भेट घेण्याचा विचार केला. कारण याआधीसुद्धा त्याने एका कार्यक्रमात जॅकमनची भेट घेतली होती. पण, आता मात्र त्याने जॅकमनपाशी जाण्याआधी पुनर्विचार केला. त्यावेळी त्याला वूडी अॅलेन यांच्यासोबतचा ‘तो’ प्रसंग आठवला. आपला पुन्हा एकदा चारचौघात नकळत अपमान होऊ नये याच भावनेने त्याने ह्यू जॅकमनची भेट घेणं टाळलं. त्यावेळी जॅकमनची भेट न घेतल्यामुळे आपल्याला त्यांची भेट घेणं महत्त्वाचं वाटत नाही असं उपस्थितांना वाटलं असावं, हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

नेहाच्या या ऑडिओ चॅट शोमध्ये करणने बऱ्याच गोष्टींवर खुलेपणाने चर्चा केली आहे. नेहमी आपल्या कार्यक्रमात सेलिब्रिटींना बोलवून त्यांची मुलाखत घेणारा करण जेव्हा काही हटके प्रश्नांना सामोरा जातो त्यावेळी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची त्याची कला आणि रंजक शैली चर्चेचा विषय ठरते हे नाकारता येणार नाही. ‘नो फिल्टर नेहा’च्या या भागातही असंच काहीसं घडल्याचं लक्षात येत आहे.

First Published on October 12, 2017 3:09 pm

Web Title: bollywood director producer karan johar was insulted by a hollywood celebrity revealed