कंगना राणावत, अमिताभ बच्चन मानकरी; ‘बाहुबली’ सवरेत्कृष्ट चित्रपट, रिंगण उत्कृष्ट मराठी चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा कंगना राणावत हिने सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रिंगण हा सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. बहुभाषिक चित्रपटात ‘बाहुबली’ला गौरवण्यात आले आहे, तो पुरस्कार वगळता इतर प्रवर्गात बॉलीवूडचे वर्चस्व राहिले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरू हिला ज्युरींचा विशेष पुरस्कार मिळाला असून ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यासाठी पाश्र्वगायक महेश काळे यांना गौरवण्यात आले.
‘पिकू’ या कौटुंबिक नाटय़ावर आधारित चित्रपटात रोगभ्रमित वडिलांची भूमिका साकारणाऱ्या बच्चन (७३) यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावत (२९) हिला ‘तनू वेडस मनू रिटर्न्‍स’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. कंगना म्हणाली की, अमिताभ यांच्यासारख्या अभिनेत्याबरोबर हा सन्मान होत असल्याचा वेगळा आनंद आहे. कंगनाचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘क्वीन’ या चित्रपटासाठी तिला गेल्या वर्षी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी २००८ मध्ये फॅशन चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. एस. एस. राजामौळी यांच्या ‘बाहुबली’ या बिगबजेट चित्रपटास सवरेत्कृष्ट फीचर फिल्म गटातील पुरस्कार मिळाला. संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून या चित्रपटास इतर पाच सन्मानही मिळाले आहेत. ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाला उत्कृष्ट हिंदूी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सलमान खान याच्या ‘बजरंगी भाईजान’ने लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ‘तलवार’ चित्रपटास उत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा तर ‘पिकू’ व ‘तनू वेडस मनू रिटर्न्‍स’ या चित्रपटांना उत्कृष्ट मूळ चित्रपटकथेचा पुरस्कार मिळाला. नानक शाह ‘फकीर’ या चित्रपटाला नर्गीस दत्त पुरस्कार मिळाला असून राष्ट्रीय एकात्मतेवरील उत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून या चित्रपटाची निवड झाली. उत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कारही या चित्रपटास मिळाला आहे.

इतर पुरस्कार
परीक्षकांचा विशेष पुरस्कार शोनाली बोस यांच्या ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ या चित्रपटात सेरेब्रल पाल्सी या मेंदूरोगाने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका करणाऱ्या कालकी कोचलिनला मिळाला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात तन्वी आझमी हिला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी रेमो डिसूझाला याच चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘ व ‘दीवानी मस्तानी’ या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले आहे. उत्कृष्ट छायालेखन, निर्मिती, फेरध्वनिमुद्रण असे पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले. तामिळ अभिनेते सामुथिरकनी यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार ‘विसरनाइ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला. उत्कृष्ट तामिळ चित्रपट व उत्कृष्ट संपादनाचे पुरस्कार याच चित्रपटाला मिळाले. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ या गाण्यासाठी मोनाली ठाकूर यांना गायनाचा तर गीतलेखनासाठी वरुण ग्रोव्हर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यासाठी पाश्र्वगायक महेश काळे यांना गौरवण्यात आले. ‘बाहुबली’ चित्रपटाला उत्कृष्ट विशेष परिणामांचा पुरस्कार मिळाला आहे, तर रेसुल पोकुटी यांच्या ‘नानक शाह फकीर’ या चित्रपटाला उत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार मिळाला आहे. उत्तर केरळातील कीटकनाशकांच्या वाईट परिणामांवर आधारित ‘वालिया चिराकुला पक्षीकाल’ या चित्रपटाला पर्यावरण संवर्धन गटात गौरवले आहे. ‘दुरांतो’ या चित्रपटास उत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून गौरव मेनन याने उत्कृष्ट बालकलाकाराचा मान ‘बेन’ चित्रपटातील भूमिकेसाठी पटकावला. ‘निर्नायकम’ हा उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला असून ‘तलवार’ चित्रपटातील ध्वनिमुद्रणासाठी बेस्ट लोकेशन साउंड रेकॉर्डिस्ट पुरस्कार मेघना गुलजार यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार ‘एनू निंटे मोइदीन’मधील ‘कथिरून नू कथिरूनू’ या गाण्याला मिळाला तर संगीतकार इलयाराजा यांना ‘थराय थप्पटाय’ साठी उत्कृष्ट पाश्र्वसंगीतरचनेचा पुरस्कार मिळाला. भास्कर हजारिका यांच्या ‘कोथानोडी’ या चित्रपटास उत्कृष्ट आसामी चित्रपटाचा तर गौतम घोष यांच्या ‘शांखचिल’ या चित्रपटास उत्कृष्ट बंगाली चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मसान’ चित्रपटासाठी नीरज घायवन यांना पहिल्याच प्रयत्नातील उत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला आहे.