अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अखेर जामिन मिळाला. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर तिची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली. परंतु रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती हा मात्र अद्याप कोठडीतच आहे. रिया प्रमाणेच शोविकला देखील जामीन मिळावा यासाठी वकिल सतीश मानशिंदे यांनी कोर्टाकडे विनंती अर्ज केला होता. परंतु ही विनंती कोर्टाने फेटाळली आहे. उलट त्याच्या कोठडीत आणखी १५ दिवसांची वाढ झाली. परिणामी येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीच राहावं लागणार आहे.
अभिनेत्री रिया आणि शोविक चक्रवर्ती हे अंमली पदार्थांच्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत, असा दावा अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) केला आहे. रिया सक्रिय सदस्य आहे. तिने सुशांतला ड्रग्जचं सेवन करण्यास उद्युक्त केलं. तसंच त्याला ते उपलब्ध करून दिले, त्यासाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही एनसीबीतर्फे यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा संघटित गुन्हेगारीच आहे. अटकेच्या भीतीने रियाने काही सांगितले नाही. तिला हा सगळा प्रकार बेकायदा असल्याचे माहीत होते. त्यानंतरही ती त्यात गुंतली होती, असाही आरोप न्यायालयात करण्यात आला होता. सध्या या प्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे. त्यामुळे शोविक चक्रवर्तीला अद्याप जामिन मिळालेना नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 3:55 pm