‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, या चित्रपटाकडे सध्या कलिविश्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. राजकीय विषयांवर चित्रपट साकारण्याची ही पहिलीच वेळ नसली तरीही या चित्रपटाचा विषय गंभीर असल्यामुळे त्यात कोणत्या कलाकाराच्या वाट्याला कोणत्या भूमिका येतात हे जाणून घेण्यासाठी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्याविषयीच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, सोनिया गांधी यांची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झाले आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्री सुझान बर्नेटच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या वादग्रस्त पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ज्यामध्ये माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सुझानची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत.

सुझानने याआधीही सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे. अभिनेते- दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सूत्रसंचालन कलेल्या प्रधानमंत्री या टेलिव्हिजन सीरिजमध्येही तिने सोनिया गांधींची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिची निवड करण्यात निर्माते आणि दिग्दर्शकांना फार मेहनत घ्यावी लागली नाही. फक्त एकाच ऑडिशननंतर सुझानच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुझानचे संवादकौशल्य आणि तिची चेहरेपट्टी ही सोनिया गांधींशी फारच मिळतीजुळती असल्यामुळे याचा फायदाही चित्रपटात होणार हे नाकारता येणार नाही.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

राजकीय पटलावरील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार असून, त्यामध्ये अनेक कलाकार पाहण्याची संधी मिळणार आहे. सीताराम येचुरी, ए. राजा, एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद यादव, कपिल सिब्बल, पीव्ही नरसिंह राव, उमा भारती, मायावती आणि अशा अनेक मंडळींच्या व्यक्तीरेखा साकारण्यात येणार आहेत. तेव्हा आता यासाठी कोणत्या कलाकारांच्या नावांना प्राधान्य दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यापर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असून, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.