‘आशिकी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्याच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती एक वेगळच काम करत होती. बऱ्याच बी टाऊन कलाकारांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचं प्रोफेशन वेगळं असल्याचं आपण पाहिलं आहे. श्रद्धाही त्यापैकीच एक. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती बोस्टनमध्ये एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. तुमचाही विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरं आहे.

कलाकारांच्या सान्निध्यात वावरलेली आणि कलाविश्वाला जवळून पाहिलेली श्रद्धा शिक्षणाच्या निमित्ताने काही वर्षे बोस्टनमध्ये होती. शिक्षण सुरु असतानाच तिने काम करण्याचा निर्णय घेतला होता. काम करुन स्वावलंबी होण्यासाठी आणि हातात चार पैसे यावेत यासाठी तिने हे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोणतही काम लहान किंवा मोठं नसतं ही बाब श्रद्धाच्याही लक्षात आली होती असच म्हणावं लागेल.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

बोस्टनमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतलेल्या श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘आशिकी २’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती. पदार्पणाच्या चित्रपटातच श्रद्धाचा हा परफॉर्मन्स पाहता तिच्याकडून असणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. सध्या ही ‘आशिकी गर्ल’ एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अपू्र्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना पारकर’ या चित्रपटातून ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या म्हणजेच हसीना पारकरच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका पाहता श्रद्धाने तिच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळत आहे.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन