एका व्यावसायिकाची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच त्याबाबत माहिती लपवून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला दिल्ली उच्च न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, राजपाल याच्या पत्नीसोबत त्यांचे लहान बाळ असल्यामुळे न्यायालयाने तिच्या शिक्षेत सूट दिली.
राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने दिल्लीतील एम जी अगरवाल या व्यावसायिकाकडून चित्रपट निर्मितीसाठी पाच कोटी रुपये कर्ज घेतले होते, मात्र ते कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे व्यावसायिकाने दोघांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे राजपाल आणि त्याच्या पत्नीने पैसे लवकरच परत करण्याबाबतचे आश्वासन न्यायालयात दिले होते. मात्र त्यानंतरही या दोघांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत दिशाभूल केली. या घटनेची गंभीर दखल घेत न्या. एस मुरलीधर यांनी राजपाल आणि त्याच्या पत्नीला मंगळवारी १० दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र राजपाल याच्या पत्नीसोबत त्यांचे लहान मूल असल्यामुळे तिला शिक्षेत सवलत देण्यात आली.
दरम्यान, राजपाल याच्या पत्नीच्या वास्तव्याबद्दल चुकीची माहिती दिल्याप्रकरणी तिच्या वकिलांनाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी  नोटीस पाठविण्यात आली आहे.