बॉलीवूड आणि होळीचे नाते फार पूर्वीचे आहे. कित्येक दशके होळीच्या निमित्ताने तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत अख्खे बॉलीवूड आपापसांतले हेवेदवे विसरून एकत्रित होळी साजरी करीत. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील होळी साजरी करण्याचे प्रमाण कमी झाले असून यंदाही अमिताभ बच्चनसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत होळी साजरी करण्यास पसंती दिली.
दरवर्षी पृथ्वीराज कपूर यांच्या काळापासून सुरू झालेली ‘आर. के. स्टुडिओ’मधील होळी, अमिताभ बच्चन यांच्या घरच्या होळी पार्टीच्या आमंत्रणाची बॉलीवूडकर आतुरतेने वाट पाहते. त्याशिवाय शाहरूख खान, सुभाष घई, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी पार्टीसुद्धा प्रसिद्ध होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये होणाऱ्या या होळी पार्टीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. कित्येक बॉलीवूड सेलेब्रिटी होळीच्या दिवशी चित्रीकरणासाठी परदेशी असतात, तर काही जण सुट्टी घेऊन घरच्यांसोबत वेळ घालविणे पसंत करतात. यंदा होळीसोबत आलेल्या स्वाइन फ्लूचे सावट बॉलीवूडपर्यंत पोहोचले आहे. नुकतेच सोनम कपूरला स्वाइन फ्लूची लागण झाली. त्याचप्रमाणे रंगांमुळे होणारे साइड इफेक्ट्स, अ‍ॅलर्जी यामुळे यंदा कित्येक सेलेब्रिटींनी होळी न खेळण्यास पसंती दिली आहे.
पण असे असले तरी, नित्यनियमाप्रमाणे ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया साइट्सवर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देणे या सेलेब्रिटीजनी चुकविले नाही. अमिताभ बच्चन यांनी ‘होळी की अनेक अनेक शुभकामनायें.. स्नेह.. आदर’ असे ट्विट केले आहे. शाहरूख खान आपला मुलगा अब्राहम याच्यासोबत त्याची पहिली होळी साजरी करीत असून त्याच्यासोबत फुगे फोडण्याचा आनंद घेत असल्याचे ट्विट त्याने केले. तर प्रियांका चोप्रा सध्या चित्रीकरणानिमित्त अमेरिकेत असल्यामुळे तिने घरी खेळली जाणारी होळी, रंग, गुजिया यासारख्या गोड पदार्थाची आठवण येत असल्याचे सांगितले. लता मंगेशकर, सोनाक्षी सिन्हा, फराह खान, रितेश देशमुख, बोमन इराणी, रवीना टंडन, अभिषेक बच्चन यांनीही आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ता आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी होळीच्या शुभेच्छा देताना पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेशही चाहत्यांना दिला. तर अभिनेता ऋषी कपूर यांनी रस्त्यावरील कुत्र्यांना रंग न लावण्याचे आवाहन केले.
टीव्ही मालिकांच्या सेटवर होळीला उधाण
बॉलीवूडमध्ये होळीनिमित्त शुकशुकाट असला, तरी मालिकांच्या सेटवर मात्र यंदा टीव्ही कलाकरांनी होळीची पुरेपूर धमाल करून घेतली. नुकतीच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘वीरा’, ‘मास्टरशेफ’, ‘कुमकुमभाग्य’, ‘इतना करो ना मुझसे प्यार’ असा विविध मालिकांच्या सेटवर होळी साजरी करण्यात आली. तसेच ‘लाइफ ओके’ वाहिनीवर खास होळीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळीनिमित्त अभिनेता शिवाजी साटम यांनी पाण्याचा अपव्यय न करता होळी खेळण्याचे आवाहन चाहत्यांना केले. तर अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी हिनेही आपल्याला सुट्टी घेऊन घरच्यांसोबत अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये होळी साजरी करायला आवडत असल्याचे सांगितले.