अभिनेता इरफान खान याच्या निधनानंतर त्याची पत्नी सुतापा सिकंदर सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असल्याचं दिसून येतं. गेल्या काही दिवसांपासून ती बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत आहे. अलिकडेच तिने एका पोस्टमध्ये कलाविश्वातील घराणेशाही,इनसाइडर आणि आऊटसाइडर यांच्यावर भाष्य केलं आहे. तसंच या पोस्टचा आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा कोणताही संबंध नाही असंही तिने स्पष्ट केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. यामध्येच सुतापाने घराणेशाही, इनसाइर व आऊटसाइडर यांच्याविषयी मत मांडलं आहे.

“बाहेरचं कोण आहे? हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये इनसाइडर आणि आऊटसाइडर यांच्यामध्ये एक अस्पष्ट अशी धुरकट रेष आहे. हे सगळं बंद करा. इनसाइडर आणि आऊटसाइडर या मुद्दा फक्त डिझायनर पत्रकांमध्येच शोभा देतात. जर आऊटसाइडरवरच चर्चा करायची असेल तर त्यात इरफान खानच्या नावाचदेखील समावेश होऊ शकतो. मात्र, त्याने कायम या सगळ्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तसंच कलाविश्वात काय घडतं याचा साक्षीदार स्वत: इरफान होता. सुरुवातीच्या काळात इरफानलादेखील कोणत्याही पार्ट्यांसाठी आमंत्रित करण्यात येत नव्हतं. तसंच तो कोणत्याही मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकला नव्हता. मात्र, या सगळ्या परिस्थितीमध्ये खचून किंवा उदास न होता. तो त्याचं काम करत राहिला. त्याने कधीच अन्य लोकांविषयी चर्चा करण्यात त्याचा वेळ घालवला नाही, त्याने सगळं लक्ष त्याच्या कामाकडे केंद्रित केलं होतं”, असं सुतापा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “ही एक सामान्य बाब आहे की कोणीही तोपर्यंत बॅालिवूडचा मालक होत नाही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की काही लोकं आहेत जे या इंडस्ट्रीचे मालक आहेत. इरफानला हॉलिवूडच्या ऑफर्स आल्या याविषयी बॉलिवूडमध्ये कोणीच काही बोलू शकत नाही. इरफानने हॉलिवूडमधील ‘द नेमसेक’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘इन्फर्नो’, ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेजिंग स्पाइडर-मॅन’ आणि ‘द वॉरियर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे”.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुतापा सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. अलिकडेच तिने सीबीडी ऑइलला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणीही केली होती.