‘धडक’ या चित्रपटातून जान्हवी कपूर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचा अभिनयातील वारसा पुढे चालवणाऱ्या जान्हवीकडून प्रेक्षकांच्याही बऱ्याच अपेक्षा होत्या ज्या पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्नही करत आहे. पण, सध्या तिच्यामध्ये आणि कलाविश्वात पदार्पणासाठी सज्ज असणाऱ्या सारा अली खान हिच्यामध्ये अनेकांनीच तुलना करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्रींच्या नावांचाही समावेश आहे.

आपल्यामध्ये होणारी ही तुलना अजिबातच योग्य नसल्याचं जान्हवीने ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. ‘मला कळत नाही आहे की आम्हाला एकमेकांविरोधात का उभं केलं जात आहे ? मला असं वाटत आहे की लोकांना हे असं करण्यात जरा जास्तच रस आहे. कधीकधी ही अशी स्पर्धा अगदीच चुकीची ठरते’, असं जान्हवी म्हणाली.

हा प्रश्न फक्त अभिनेत्रींनाच का विचारला जातो, हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत इशान खट्टरला कधी असे प्रश्न विचारण्यात आले आहेत का, त्याला या स्पर्धेविषयी विचारलं जातं का, असा प्रतिप्रश्नही तिने उपस्थित केला. आपण, कलाकार म्हणून एकमेकांच्या यशातही तितकेच आनंदी असतो असं म्हणत जान्हवीने आपले सहकलाकारांविषयीचे विचार सर्वांसमोर मांडले.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

सध्याच्या घडीला जान्हवीचाच चित्रपट प्रदर्शित झाला असून, येत्या काळात सारा अली खान, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या चित्रपटांसाठी आपण फार उत्सुक असल्याचंही जान्हवीने स्पष्ट केलं.