लॉकडाउनमुळे सर्वांचंच आर्थिक गणित कोलमडलंय. यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावरही आर्थिक संकट कोसळलंय. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जिला ओळखलं जातं अशा कंगना रनौतने तिच्याकडे सध्या कोणतंच काम नसल्याची कबुली दिली आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक संकटात सापडल्याची कबुली दिलीये.

अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा उल्लेख ‘भारतात सर्व जास्त कर भरणारी अभिनेत्री’ असा केला. पण लॉकडाउनचा फटका बसल्याने ती आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या वर्षीपासून तिला कोणतंच काम मिळालं नाही. त्यामुळे तिने गेल्या वर्षी अर्धाच कर भरला असल्याचं देखील तिने सांगितलं. आपली व्यथा तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्यक्त केली आहे. सोबतच तिने केंद्र सरकारच्या ‘इच वन पे वन पॉलिसी’ चा व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी तिने लिहिलं, “जरी मी सगळ्यात जास्त कर भरणारी अभिनेत्री असली तरी सध्या माझ्या हातात काही काम नाही. मी माझ्या एकूण कमाईच्या ४५ टक्के इतका कर भरत असते. पण आता काम नसल्यामुळे मी आतापर्यंत गेल्या वर्षी अर्धा कर भरलेला नाही. पैसे नसल्यामुळे मला तो भरता आला नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला कर भरण्यासाठी उशीर झालाय.”

Kangana-Ranaut's-Confession-Overdue-Tax
(Photo_Instagram@kanganaranaut)

यापुढे कंगनाने लिहिलं, “सरकार माझ्या थकित करावर व्याज जोडत आहे. मात्र मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करते. सध्याचा काळ सर्वांसाठीच कठीण आहे, मात्र आपण सर्वजण एकत्र अशा काळावर मात करुया.”

कंगना रनौतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘थलायवी’ चित्रपट अजूनही रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. तसंच जयललिता यांची भूमिका केलेला बायोपिक यावर्षी रिलीज होणार होता, मात्र कोरोना परिस्थितीमुळे रिलीजची तारीख पुढे ढकल्यात आली. त्याचप्रमाणे कंगनाचे ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे चित्रपट ही प्रतिक्षेत आहेत. लवकरच मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ आणि इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटातही ती झळकणार आहे.