काही दिवसापूर्वी ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे निर्माते करिम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र योग्य ते उपचार घेतल्यानंतर हे तिघंही करोनामुक्त झाले आहेत. करिम मोरानी यांची दुसरी चाचणीही निगेटीव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. घरी परतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

‘पीटीआय’नुसार, “देवाच्या कृपेमुळे मी व्यस्थित बरा होऊन आता घरी परतलो आहे. माझ्या दोन वेळा करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून दोन्ही निगेटीव्ह आल्या. नानावटी रुग्णालयात असताना मी प्रचंड अस्वस्थ होतो. मात्र सरकारपासून ते वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांचं काम चोखपणे बजावत आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळेच मी आज बरा होऊन परत आलो आहे. मात्र पुढील १४ दिवस मी क्वारंटइन राहणार आहे. घरी आल्यावर बरं वाटतंय. सुरक्षित रहा”, असं करिम मोरानी म्हणाले.

दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करिम मोरानी यांची लेक शाजा श्रीलंकाहून परतली होती. तर दुसरी लेक झोया मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. त्यानंतरच या दोघींच्या करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. इतकंच नाही तर त्यामुळे करिम मोरानी यांनीही करोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ते हार्ट पेशंट असल्यामुळे घरातल्यांना त्यांची विशेष काळजी होती. करिम हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इअर’ आणि ‘रा वन’ या चित्रपटांचा समावेश आहे.