पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रमोट करण्यासाठी खिलाडी कुमारच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं जात आहे. पण, या चित्रपटातून स्वच्छतेविषयी केली जाणारी जनजागृती सेन्सॉरलाही खटकली आहे असंच म्हणावं लागेल. कारण, या चित्रपटातील काही संवाद सेन्सॉरच्या सांगण्यावरुन वगळण्यात आले आहेत. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटातील आठ संवादांवर सेन्सॉरची कात्री चालली आहे. पण, वृत्तसंसंथेला दिलेल्या माहितीत खिलाडी कुमारने मात्र या चित्रपटातील तीन संवादांवरच सेन्सॉरची कात्री चालल्याचं सांगितलं आहे. मुख्य म्हणजे सेन्सॉरचा हा पवित्रा अनेकांनाच खटकला आहे.

या चित्रपटातील एका दृश्यामध्ये अक्षय कुमार भूमीला उद्देशून म्हणतो, ‘तुमने मुझे तीन बार जगाया… मै कोई सांड हू क्या’, तर दुसऱ्या एका दृश्यामध्ये तो कानाच्या भोवती जानवं टांगून शौचाला जातो. त्यामुळे या दृश्याची गरज नसतानाही ते चित्रपटामध्ये असल्यामुळे या दृश्यावरही सेन्सॉरची कात्री चालली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता त्यामध्ये काही संवाद कथानकाच्या अनुषंगाने गरजेचे होतेच. पण, आता ही बाब सेन्सॉरला कोण समजावणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खिलाडी कुमार सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. मुख्य म्हणजे त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही बी- टाऊन सेलिब्रिटीही पुढे सरसावले आहेत. यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि रितेश देशमुखच्या नावांचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि खिलाडी कुमार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या दोघांची देसी केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.