ईदच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शाहरुख खानने त्याच्या घरी माध्यमांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी शाहरुखला त्याच्या मुलांविषयीही बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्यातही सुहानाविषयीच्या प्रश्नांची संख्या तुलनेने जास्त होती.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका रेस्तराँच्या उद्धाटन सोहळ्यावेळी सुहानावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण, त्यानंतर ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी जेव्हा सुहाना गेली होती, त्यावेळी छायाचित्रकारांनी तिला घेरलं आणि तिचे फोटो घेण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामध्ये ती बरीच गोंधळून गेल्याचंही पाहायला मिळालं.

याविषयी सांगताना शाहरुख म्हणाला, ‘प्रसारमाध्यमांनी माझ्या मुलांना उगाचच महत्त्वं देणं मला आवडत नाही. राहिला विषय तिच्या चित्रपटक्षेत्रात येण्याविषयी तर, सेलिब्रिटींसोबत सार्वजनिक ठिकाणी जाणं म्हणजे तुम्हाला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे असा अर्थ होत नाही. बहुधा असं असेलही. पण, मुलं ही काही कोणी स्टार नाहीत. ती फक्त आम्हा कलाकारांची मुलं आहेत. ते ज्यावेळी माझ्यासोबत असतात तेव्हा मी नेहमीच याकडे लक्ष देतो की ते माझ्यासोबत उभं राहून फोटो काढून घेतील.’ माध्यमांसोबत संवाद साधताना शाहरुखने त्यांना एक विनंतीही केली. ‘मुलांचे फोटो काढताना जरा प्रेमाने काढा. एक- दोन फोटो काढून त्यांना जाऊ द्या’, अशी विनंती किंग खानने केल्याचं पाहायला मिळालं.

शिक्षण पूर्ण केल्यानंतरच सुहाना अभिनय क्षेत्राकडे वळेल असंही त्याने स्पष्ट केलं. यावेळी किंग खानने धर्माविषयीही त्याचं मत मांडलं. धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मुलांनीही याबाबतचा निर्णय स्वत:च घ्यावा असं मत त्याने मांडलं. सर्व धर्मांविषयी आदर करणारा शाहरुख म्हणाला, ‘तुम्ही एकमेकांविषयी सर्व काही जाणता कारण, तुम्ही धर्माविषयही जाणता.’ यालाच जोड देत सध्याच्या घडीला आपण महाभारत वाचत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ‘महाभारतातील काही गोष्टी मला फार आवडतात, मी त्या अब्रामलाही ऐकवतो. त्यासोबतच मी त्याला इस्लाममधीलही काही गोष्टी सांगतो. मला आशा आहे की, सर्व धर्माविषयीची माहिती मिळाल्यावर तो प्रत्येक धर्माचा आदर करेल’, असं शाहरुख म्हणाला.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या