अभिनेत्री तनुश्री दत्ता हिला बॉलिवूडमध्ये ‘मी टु’ मोहिम सुरू करण्याचं श्रेय जातं. आतापर्यंत  या मोहिमेमुळे बॉलिवूडमधल्या अनेक बड्या चेहऱ्यांची नावं समोर आली, MeTooच्या वादळात अनेक सेलिब्रिटी अडकले काहींवर अत्यंत गंभीर आरोपही झाले, हे सेलिब्रिटी कोण ते पाहू.

नाना पाटेकर
बरीच वर्षे बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं बॉलिवूडमध्ये ‘मी टु’ मोहिमेची सुरूवात केली. एका मुलाखतीत तिनं प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केलं असं तिनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. तसेच या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर नाना पाटेकर यांनी आपल्याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकरवी धमकावल्याचंही तिनं या मुलाखतीत म्हटलं होतं. हे प्रकरण इतकं गाजलं की नंतर नाना पाटेकर यांना ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपट सोडावा लागला. या आरोपानंतर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला अब्रुनुकसानीची नोटीसही पाठवली होती

आलोक नाथ
आलोक नाथ हे मनोरंजन विश्वातले ‘संस्कारी अभिनेता’ म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांचा खरा चेहरा सर्वप्रथम समोर आणला तो लेखिका- निर्मात्या विनता नंदा यांनी. आपल्या एका पोस्टद्वारे आलोक नाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता नंदा यांनी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. या आरोपानंतर एकच खळबळ मनोरंजन विश्वात उठली. या आरोपानंतर अनेक महिलांनी समोर येत आलोक नाथ यांच्या गैरवर्तणुकीचे पाढे वाचले. हिमानी शिवपुरी, संध्या मृदुल, नवनीत निशान, दीपिका अमिन यांसारख्या महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते.

साजिद खान
रेचल व्हाइट, करिश्मा उपाध्याय, सलोनी चोप्रा, सिमरन सुरी यांसारख्या अभिनेत्री आणि पत्रकार महिलांनी दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केले. हे आरोप आणि त्या महिलांनी सांगितलेले अनुभव हे धक्कादायक होते. या आरोपानंतर साजिद खान स्वत: ‘हाऊसफुल्ल ४’ च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार झाला. तर अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यानं साजिदसोबत काम करायला नकार दिला. खुद्द साजिदची बहिण फराह खान हिनंदेखील साजिद खानच्या पाठिशी उभं राहण्यास नकार दिला. तर स्वत: ला निर्दोष सिद्ध करण्यास असमर्थ असलेल्या साजिदवर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA) निलंबनाची कारवाई केली.

सुभाष घई
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरदेखील मॉडेल-अभिनेत्री केट शर्मा हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. घई यांनी ऑगस्ट महिन्यात मला घरी भेटण्यासाठी बोलावलं आणि तिथे त्यांनी असभ्य वर्तन केलं. यावेळी घई यांच्या घरी त्यांच्याव्यतिरिक्त अन्य ५ ते ६ लोक उपस्थित होते असा आरोपही केटने केला होता. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंबियांना मानसिक त्रास होत असल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं काही दिवसांपूर्वी केट सांगितलं होतं.

राजा बजाज
मनोरंजन विश्वात काम करणारी ‘साम, दाम, दंड भेद’ मालिका फेम अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिनं कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले होते. लोणावळा येथे एका चित्रीकरणादरम्यान बजाज यांनी दारूच्या नशेत आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असं सोनलनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. २०१२ मध्ये सोनलनं कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकात राजा बजाज यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावेळी सोनलसोबत असलेल्या मॉडेल आणि तिच्या आईनंही जबाब नोंदवला होता. मात्र सोनलनं केलेले आरोप राजा बजाज यांनी फेटाळून लावले होते. सोनलनं पैशांची मागणी केली होती. पण, पैसे न दिल्यानं तिनं गंभीर आरोप केले आहेत असं म्हणत राजा यांनी सोनलचे आरोप फेटाळून लावले होते.

अनिर्बन दास ब्ला
एका सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीचे माजी सह-संस्थापक अनिर्बन दास ब्ला याच्यावरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप होते. ब्ला यांच्या चार महिला सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपानंतर ब्ला यानं नवी मुंबईतील एका पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

अनु मलिक
संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावरदेखील लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रानं केला होता. गायिका श्वेता पंडितनेदेखील ट्विटरवर पोस्ट लिहित अनु मलिकनं केलेल्या गैरवर्तणुकीचा प्रकार जगासमोर आणला होता.