अथक परिश्रम आणि बऱ्याच कलाकारांची मेहनत या साऱ्याची सांगड घातल्यानंतर एखादा चित्रपट पूर्णत्त्वास जातो. बऱ्याच महिन्यांच्या मेहनतीनंतर ज्यावेळी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी चित्रपटातील संपूर्ण टीममध्ये उत्सुकतेचे वातावरण असते. पण, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अय्यारी’ चित्रपटाच्या बाबतीत मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळणारा हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला असून, त्याचे पायरेटेड व्हर्जन सरकारी बसमध्ये दाखवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुख्य म्हणजे आपण मेहनत घेतलेल्या चित्रपटाविषयीची ही माहिती मिळताच दिग्दर्शक नीरज पांडे आणि अभिनेता मनोज बाजपेई यांनाही धक्का बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याविषयीची नाराजी व्यक्त केली. फक्त ‘अय्यारी’च नव्हे तर कोणत्याही चित्रपटाच्या पायरसीचा कलाविश्वातून विरोध केला जात असून, त्यानंतर त्यांनी सरकार आणि नागरिकांना उद्देशून पायरसीपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि स्पष्ट शब्दांत म्हणतो, ‘नो टू पायरसी’, असं ट्विट करत नीरजने आपली नाराजी व्यक्त केली.

वाचा : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ते भुवई उंचावणं चोरीचं?

१६ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या अय्यारी या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी आणि रकुल प्रीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. नीरज पांडेचं दिग्दर्शन असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण, या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये वाढ झाली नसून निर्माते, दिग्दर्शकांससमोर मोठा प्रश्नच उभा राहिला आहे.