News Flash

सीधेसाधे अक्षय..

सध्या दर चार चित्रपटांमागे एका चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असतो.

हिंदी चित्रपटसृष्टीत हिरो म्हणून ओळख मिळवणं आणि ती वर्षांनुवर्ष टिकवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्वचित एखाद्याचा एखादा चित्रपट सुपरहिट होतो आणि त्याला हिरो म्हणून नावलौकिकही मिळतो. मात्र ही हिरोगिरी टिकवत आपल्या चित्रपटांनी आर्थिक यश आणि चाहत्यांचे प्रेम या दोन्ही गोष्टी खेचून आणत आघाडीच्या यादीत झळकणं हे आव्हान फार कमीजणांना जमले आहे. त्यातही सध्या आघाडीची फळी म्हणून मानले जाणारे तीन खान आणि त्यांच्यानंतर अजय देवगण, अक्षय कुमार यांच्यापुढे ही यादी अजूनही पोहोचलेली नाही. यातही गेल्या काही वर्षांत आपल्याला हव्या तशा भूमिका मिळवत सातत्याने प्रेक्षकांपुढे येण्यात आणि शंभर कोटी का होईना सातत्याने यशस्वी चित्रपट देण्यात अभिनेता अक्षय कुमारने सगळ्यांना मात दिली आहे. याहीवर्षी १५ ऑगस्ट, दिवाळी आणि नाताळ तिन्ही मुहूर्तावर अक्षय आणि अक्षयचेच चित्रपट झळकणार आहेत.

सध्या दर चार चित्रपटांमागे एका चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असतो. किंवा कुठल्याही चित्रपटाची चर्चा सुरू झाली तर त्यातली महत्वाकांक्षी भूमिका अक्षयच्याच नावे होणार, अशी चर्चा असते. गेल्यावर्षी टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन, गोल्ड,  २.० आणि सिम्बा चित्रपटातील पाहूण्या कलाकाराची भूमिका असा अक्षय कुमारचा प्रवास होता. याहीवर्षी त्याचे चार चित्रपट आहेत. त्यातले दोन चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत.  आणि त्यांनी चांगले यश मिळवले आहे. तर इतर दोनही सणांच्या आणि सुटय़ांच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारला अचानक यश मिळालेले नाही, मात्र सध्या त्याच्याबद्दल जी चर्चा सुरू आहे ती त्याने निवडलेले चित्रपट आणि भूमिकांमुळे.. सरकारी योजनांवर आधारित चित्रपट करतो म्हणून त्याची टिंगलटवाळी केली गेली खरी, पण ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि  ‘पॅडमॅन’ या त्याच्या दोन्ही सामाजिक विषयांवरच्या चित्रपटांनी तिकीटबारीवरही यश मिळवले आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. त्याचवर्षी त्याने ‘२.०’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासमोर खलनायकाची भूमिकाही साकारली. आशय आणि भूमिकांमधील हे प्रयोग त्याला त्याच्या पुढच्या चित्रपटांसाठी वाट खुली करून देणारे ठरले.

त्यामुळे याहीवर्षी एकीकडे ‘के सरी’, ‘मिशन मंगल’सारखे देशभक्तीपर चित्रपट देणारा अक्षय कुमार ‘हाऊसफुल्ल ४’ मध्येही दिसणार आहे. आणि ज्योती कपूर लिखित ‘गुड न्यूज’ या चित्रपटातही करीना कपूरबरोबर एका वेगळ्या विषयावर तो काम करताना दिसतो आहे. भाडोत्री मातृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे. याशिवाय, रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही तो दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकचेही चित्रिकरण सुरू झाले असून हाही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर दिग्दर्शक नीरज पांडे चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. त्याही भूमिकेसाठी अक्षयचाच विचार केला गेला आहे. ‘राऊडी राठोड’चा सिक्वलही अक्षयलाच करण्याची इच्छा आहे. एकूणच जिथे तिथे अक्षय कुमारच्याच नावाची चर्चा सुरू असलेली सध्या पहायला मिळते आहे. फार वर्षांपूर्वी त्याचा ‘खिलाडियों का खिलाडी’  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात हम है सीधे साधे अक्षय अक्षय.. असं त्याचं गाणं प्रसिध्द झालं होतं. याच सीध्या-साध्या अक्षयने सध्या बॉलिवूड दिग्दर्शक-निर्मात्यांना भुरळ घातली आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:04 am

Web Title: bollywood movie ajay devgan akshay kumar kareena kapoor akp 94
Next Stories
1 टिक टिक टिकली..!
2 मानवी मूल्यांचा मेलोड्रामा
3 चतुरस्र चिन्मय..
Just Now!
X