शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर हिने कलाविश्वात पदार्पण केलं. इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत चांगला गल्ला जमवला असून, चाहते आणि इतर कलाकारांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. त्याबद्दल आता जान्हवीने सर्वांचेच आभार मानले आहेत.
सोशल मीडियाची मदत घेत जान्हवीने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो पोस्ट केले. ‘धडक’च्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानत जान्हवीने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सर्वांचच लक्ष वेधत आहेत. चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध कुटुंबाशी नातं असल्यामुळे जान्हवीकडून अनेकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. त्याच अपेक्षांच्या जोडीने जान्हवीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून तिने सर्वांचेच मनापासून आभार मानले.
करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची सहनिर्मिती असणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटानंतर आता जान्हवी आणि इशानच्या भावी प्रोजेक्टकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘धडक’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावरून झळकलेली त्यांची केमिस्ट्री आणि चित्रपटाच्या कथानकाची बरीच प्रशंसा झाल्याचं पाहायला मिळालं. काहींनी या चित्रपटाची तुलना ‘सैराट’ या चित्रपटाशी करत ‘धडक’ न आवडल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या. पण, तरीही चित्रपटाच्या टीमने यातूनही एक शिकवण घेत आपल्याला या प्रतिक्रियांची अपेक्षा असल्याचं स्पष्ट केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 12:41 pm