महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावर आता नाटकानंतर बॉलीवूडमध्ये चित्रपट तयार होत असून या निमित्ताने नथुराम गोडसे यांचा जीवनपट मोठय़ा पडद्यावर येणार आहे. मराठी रंगभूमीवर सादर झालेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरले होते. नथुराम यांच्यावरील चित्रपट वादग्रस्त ठरतो किंवा नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महात्मा गांधी यांचा मारेकरी म्हणून ओळख असलेल्या नथुराम गोडसे यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. केवळ ‘गोडसे’ आडनाव आहे म्हणून काही दिवसांपूर्वी एका खासदारालाही लोकसभेत त्याचा सामना करावा लागला होता. नथुराम गोडसे यांच्यावर मराठी रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकानंतर आता बॉलीवूडलाही या नावाने आकर्षित केले असून नथुराम यांच्या जीवनावरील ‘गोडसे ट्रायल’ या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
‘इतना करो ना मुझसे प्यार’ या दूरचित्रवाहिनीवरील मालिकेतील अभिनेता दर्शन पांडय़ा चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणार आहे. विजय कौशिक यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलोक अरविंद ठाकूर व आदित्य जोशी यांची आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला अनेक दिवस नवी दिल्ली येथे न्यायालयात चालला. ‘गोडसे ट्रायल’ या चित्रपटात नथुराम हे कारागृहात असतानाच्या दिवसांवर अधिक भर देण्यात आला आहे. चित्रपटात न्यायालयातील खटल्याचे चित्रीकरण पाहायला मिळणार नाही. पण नथुराम यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना, प्रसंग यात दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.