हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अॅक्शन हिरो’ म्हणून नावारुपास आलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आजवर बऱ्याच भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या तो चर्चेत आहे तो म्हणजे आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटामुळे. हॉकी या खेळाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाच्या कथानकाला देशभक्तीचीही जोड देण्यात आली आहे. अशा या चित्रपटात खिलाडी कुमार तपन दास ही भूमिका साकारणार आहे.

बंगाली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अक्षयने बरीच मेहनतही घेतली होती. बंगाली भाषा शिकण्यापासून ते अगदी त्या भूमिकेसाठीच्या वेशभूषेपर्यंत सर्वच गोष्टींमधील बारकावे त्याने टीपले होते, त्यावर अभ्यास करुन नंतरच अक्षयने हे पात्र साकारलं होतं.

स्वातंत्र्य भारताला ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यासाठीचं स्वप्न पाहणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या स्वप्नांचं प्रभावी चित्रण ‘गोल्ड’मधून करण्यात आलं आहे. भूतकाळात डोकावणाऱ्या या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण ब्रिटन आणि भारतात करण्यात आलं आहे.

१९४८ मध्ये लंडनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय हॉकी संघाला प्रशिक्षित करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत अक्षय झळकणार आहे. तेव्हा आता अतिशय महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या भूमिकेसह अक्षय प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

१५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारसोबतच टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉयही स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय अभिनेता कुणाल कपूर, अमित सध, विनीत सिंग, सनी कौशल हे कलाकारही या चित्रपटातून झळकणार आहेत.