अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. रणरागिणी झाशीच्या राणीच्या आयुष्यावर हा चित्रपट भाष्य करणार आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित अशा या चित्रपटामध्ये आता आणखी एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. खरंतर ते नाव अनेकांच्याच ओळखीचं असून, त्याच्याभोवती असणारं वलयही सर्वज्ञात आहे. ते नाव म्हणजे अभिनेता अतुल कुलकर्णीचं. मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी या चित्रपटातून तात्या टोपेंच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मुख्य म्हणजे अतुलने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन या चित्रपटात अभिनय करणार असल्यासंबंधीची पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने चित्रीकरणावेळीचा अनुभवही सर्वांसमोर मांडला आहे. शिवाय घोडेस्वारी करतानाचे काही फोटोही त्याने पोस्ट केले आहेत. पण, त्याने कुठेच आपल्या भूमिकेवरुन पडदा उचलला नाहीये. तेव्हा आता त्याच्या भूमिकेबद्दल जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. अतुलने या चित्रपटातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असून, तो या भूमिकेला न्याय देईल असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

कोणतीही भूमिका हाताळताना त्यामध्ये स्वत:ला झोकून देत आपलं अभिनय कौशल्य सादर करणारा हा अभिनेता क्वीन कंगनाच्या चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा आता त्याच्या या भूमिकेची पहिली झलक पाहण्यासाठीसुद्धा चाहते उत्साही आहेत. दरम्यान, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटासाठी कंगनासह इतरही सर्वच कलाकार बरीच मेहनत करत आहेत. मुख्य म्हणजे बरीच साहसदृश्ये असलेल्या या चित्रपटात कलाकार मोठ्या धाडसाने तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तलवारबाजीच्या एका दृश्याच्या चित्रीकरणावेळी कंगना दुखापतग्रस्त झाली होती.

सहअभिनेता निहार पंड्यासोबत दृश्याचं चित्रीकरण करतानाच कंगना आणि निहारच्या वेळेत चुकामुक झाली आणि तिच्या भुवयांच्या मध्ये तलवारीमुळे मोठी जखम झाली. सध्या कंगना आराम करत असून, या जखमेसोबतच तिने चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.