‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या नावामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. एका पदार्थाचं नाव असल्यामुळे नेमका त्याचा कथानकाशी कसा संबंध असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. पण, या नावाने फक्त कुतूहलपूर्ण वातावरणच तयार केलं नसून, एका हॉटेलची शानही वाढवली आहे. मुख्य म्हणजे एका कॉन्टीनेंटल हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये बरेली की बर्फी या पदार्थाचा समावेश केल्यामुळे सध्या अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

बॉलिवूड चित्रपटांच्या अनोख्या नावांमुळे आता खाद्यपदार्थांवरही त्यांचीच जादू पाहायला मिळत आहे. बरेली की बर्फी नावाने हा खाद्यपदार्थ सध्या अनेकांच्या पसंतीसही पडत असल्याचं कळत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये येणाऱ्या अनेकांनीच आतापर्यंत ही बरेली की बर्फी चाखून पाहिली आहे. हॉटेलच्या मालकाला या चित्रपटाचा ट्रेलर इतका आवडला की त्याने बरेली की बर्फी याच नावाच्या एका पदार्थाचा समावेश मेन्यूकार्डमध्ये करण्याचा निर्णय घेतला. कॉन्टीनेंटल रेस्तराँमध्ये असा हटके प्रयोग करत तो यात यशस्वीसुद्धा झाला आहे. त्यामुळे या पदार्थाप्रमाणेच आता या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

अभिनेत्री क्रिती सनॉन, राजकुमार राव आणि आयुषमान खुराना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात प्रेमाची देसी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि श्रेयस जैन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, अश्विनी अय्यर-तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. १८ ऑगस्टला या बर्फीची गोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.